जळगाव लाईव्ह न्यूज । १६ फेब्रुवारी २०२६ । जळगावसह महाराष्ट्रात होळीपूर्वीच उन्हाचा कडाका वाढू लागला आहे. सध्या जळगाव जिल्ह्यात थंडी ओसरली असून दुसरीकडे तापमानात वाढ झाल्याने उकाडा वाढला आहे. यामुळे फेब्रुवारीतच जळगावकर घामाघूम झाले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात २० फेब्रुवारीपर्यंत तापमानाचा पारा ३८ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

जळगावमध्ये फेब्रुवारीच्या सुरुवातीपासूनच तापमानात बदल जाणवू लागला आहे. साधारणपणे मार्च किंवा एप्रिल महिन्यात जाणवणारी उष्णता यंदा फेब्रुवारीच्या मध्यातच तीव्र झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून कमाल तापमान ३३ अंशांच्या पुढे नोंदवले जात असल्याने दुपारच्या वेळी उन्हाचा चटका बसत असून जळगावकरांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

रविवारी जळगावमध्ये किमान तापमान १५ अंश सेल्सिअसपर्यंत तर कमाल तापमान ३३.७ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. रात्रीच्या तापमानातही हळूहळू वाढ होत असल्याने थंडीचा प्रभाव कमी झाला आहे.
दरम्यान, २० फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील कमाल तापमान ३५ ते ३८ अंशांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. फेब्रुवारीतच वाढलेल्या उकाड्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळी अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि उन्हापासून बचावासाठी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
मार्चमध्ये दिलासा मिळण्याची शक्यता
दरम्यान, फेब्रुवारीअखेरपर्यंत तापमानात अस्थिरता जाणवणार असली तरी, मार्चच्या पहिल्या ते दुसऱ्या आठवड्यात कमाल तापमानात काहीशी घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मार्च महिन्यात हवामान स्थिर राहून तापमान नॉर्मल राहण्याचा अंदाज आहे.








