जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावातून एक मोठी बातमी समोर आलीय. शहरातील रामेश्वर कॉलनी येथील साई गजानन रेसिडेन्सी या अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये मध्यरात्री अचानक लागलेल्या आगीत सुमारे 15 ते 16 मोटरसायकली जळून खाक झाल्या. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली नेमकी आग कशी लागली हे समजू शकले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास साई गजानन रेसिडेन्सी या अपार्टमेंटच्या पार्किंग परिसरातून अचानक धूर व ज्वाळा उसळताना दिसून आल्या. रहिवाशांनी तात्काळ बाहेर पडत आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आग वेगाने पसरल्याने अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या आगीमुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. काही काळ परिसरात गोंधळाची स्थिती होती. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून अज्ञात व्यक्तीने जाणीवपूर्वक ही आग लावली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.









