जळगाव लाईव्ह न्यूज । १० फेब्रुवारी २०२६ । जळगाव शहरासह जिल्ह्यात सध्या थंडीची तीव्रता कमी झाली असून उकाड्याची सुरुवात झाली आहे. सकाळी आणि रात्रीची थंडी कमी होत चालली असून दुपारच्या वेळेत उन्हाची तीव्रता वाढलेली जाणवते. दरम्यान जिल्ह्यात येत्या पाच दिवसांत किमान आणि कमाल तापमानात मोठी तफावत जाणवेल. आजपासून आगामी पाच दिवस जिल्ह्यात हवामान स्वच्छ आणि कोरडे राहणार असून, उन्हाचा तडाखा वाढण्याची शक्यता आहे.

सोमवारी जळगाव शहरात कमाल तापमान ३२.३ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १२.८ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. जळगावकरांना मागील काही दिवसापासून दुहेरी वातावरणाचा अनुभव घ्यावा लागत आहे. सध्या रात्री आणि पहाटे गारवा जाणवत असला तरी दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढताना दिसत आहे.

दरम्यान, जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात १० ते १४ फेब्रुवारी या कालावधीत हवामान स्वच्छ व कोरडे राहण्याचा अंदाज आहे. या कालावधीत आकाश निरभ्र राहणार असून उन्हाचा तडाखा हळूहळू वाढण्याची शक्यता आहे. दुपारी कमाल तापमान ३१ ते ३५ अंश राहण्याची शक्यता आहे. यामुळे काहीसा उकाडा जाणवेल. सकाळी व रात्री किमान तापमान १४ ते १६ अंश राहील. यामुळे पहाटे आणि रात्री हलका गारवा कायम असेल.
दरम्यान, बारावीची परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांना दुपारच्या सत्रानंतर तीव्र उष्णतेचा सामना करावा लागू शकतो. पेपर सुटल्यानंतर उन्हात प्रवास करताना विद्यार्थ्यांनी पाणी पिणे, डोके झाकणे आणि शक्यतो उन्हापासून बचाव करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.








