जळगाव लाईव्ह न्यूज । १० जानेवारी २०२६ । जळगाव शहरासह जिल्ह्यातील तापमानात चढ -उतार सुरु असून काल शुक्रवारी एकाच दिवसात जळगावचे कमाल तापमान चार अंशांनी वाढले आहे. दुसरीकडे रात्रीच्या तापमानात मात्र घट झाली आहे. एकीकडे दिवसा उन्हाचे चटके जाणवत असताना रात्री किमान तापमानात घट झाल्याने थंडीचा कडाका कायम आहे.

गुरुवारी २५.२ अंशांवर असलेले कमाल तापमान शुक्रवारी २९.३ अंशांवर पोहोचले. तर गुरुवार ११.३ अंशावर असलेलं रात्रीचं तापमान १०.८ अंशावर घसरले. ढगाळ वातावरण, उत्तरेकडून येणारे थंड वारे थांबले आहेत. त्यामुळे जळगावच्या कमाल तापमानात वाढ झाली. मात्र पहाटे आणि रात्री थंडीचा कडाका जाणवत आहे.

तज्ज्ञांच्या मते, या बदलामागे ढगाळ वातावरण आहे. गेल्या दोन दिवसांपासून जळगावच्या आकाशात ढगांचे आवरण निर्माण झाले आहे. ही तापमान वाढ तात्पुरत्या स्वरूपाची आहे. ढगाळ वातावरण कमी झाल्यावर आणि पुन्हा उत्तरेकडून थंड वारे वाहू लागल्यावर जळगाव येथे पुन्हा थंडी वाढण्याची शक्यता बळावलेली आहे.







