जळगाव लाईव्ह न्यूज । ३० डिसेंबर २०२५ । जळगाव शहरासह जिल्ह्यातील किमान तापमानात चढ-उतार कायम आहे. सोमवारी रात्रीचे तापमान १२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यामुळे थंडीचा कडाका काहीसा कमी झाल्यानं जळगावकरांना दिलासा मिळाला आहे. मात्र नवीन वर्षात थंडी जळगावकरांची हाडे गोठवणार आहे.

उत्तर भारतातून थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे महाराष्ट्रात, विशेषतः विदर्भआणि उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता असून हवामान विभागाने (आयएमडी) इशारा दिला आहे. त्यामुळे नवीन वर्षात १ जानेवारीपासून थंडीच्या प्रमाणात प्रचंड वाढ होणार आहे. शनिवारी किमान तापमानाचा पारा ९ अंश सेल्सिअसवर जाण्याचा अंदाज आयएमडीने व्यक्त केला आहे.

जळगावमधील किमान तापमानात चढ-उतार दिसून येत आहे. २६ डिसेंबर रोजी जळगावचे किमान तापमान १२ अंशावर होते. यानंतर मागच्या दोन दिवसात तापमान पुन्हा घसरले होते. रात्रीचे तापमान ११ अंशावर आले होते. मात्र आता पुन्हा तापमानात वाढ झाली आहे. सोमवारी रात्रीचे तापमान १२.४ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले आहे. तापमानात वाढ झाली असली तरी रात्री आणि सकाळच्या वेळेस कडाक्याची थंडी जाणवत आहे. मात्र दुपारच्या वेळेस उन्हाचा चटका बसत असल्याने उकाडा जाणवत आहे.
दरम्यान, येत्या ७ दिवसांत राज्यातील हवामान कोरडे राहणार आहे. मात्र, नवीन वर्षात नागरिकांना गारठा जाणवू शकतो, असा अंदाज ‘आयएमडी’ने व्यक्त केला आहे. आयएमडीने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार १ जानेवारीपासून तापमानाचा पारा पुन्हा घसरणार आहे. दि.१ जानेवारी रोजी किमान तापमान १२ अंश तर कमाल २८ अंश सेल्सिअसवर जाणार आहे. दि.२ जानेवारी रोजी पुन्हा दोन अंश सेल्सिअसने हा पारा घसरणार आहे. त्यामुळे किमान तापमान १० अंश सेल्सिअसवर येणार आहे. तर दि. ३ जानेवारी रोजी ९ अंशांवर पारा जाणार असल्याने हाडे गोठवणारी थंडी निर्माण होणार आहे.






