Jalgaon : दुचाकी व ट्रॅव्हल्समध्ये भीषण अपघात ; तरुण ठार

डिसेंबर 17, 2025 12:05 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव- भुसावळ दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गावरील नशिराबाद नजीक सावन हॉटेलसमोर दुचाकी व ट्रॅव्हल्समध्ये भीषण अपघात झाला. त्यात दुचाकीचालकाचा मृत्यू झाला. अंकुश गोकुळ चव्हाण (वय २२, रा. मीठापूर, जि. बऱ्हाणपूर, मध्यप्रदेश) असं मृत तरुणाचं नाव असून अपघातानंतर ट्रॅव्हलचालक हा नशिराबाद पोलिस ठाण्यात हजर झाला

jalgaon mahanagar palika 10 jpg webp

काय आहे घटना?
मध्यप्रदेशमधील बऱ्हाणपूरच्या मीठापूर येथील रहिवाशी अंकुश चव्हाण हा सध्या आपल्या आतेभावाकडे कामानिमित्त रायपूर-कुसुंबा (जळगाव) येथे राहत होता. तो दुचाकी (क्र. एम.एच. १९ ई.एल. ४४६०) ने जळगावकडून नशिराबादकडे सर्विस रोडने जात असताना नशिराबादजवळ सावन हॉटेलच्या बाजूला असलेल्या सर्व्हिस रोडवरून मुख्य रस्त्यावर वाहन नेत असताना भुसावळहून जळगावकडे जाणारी एमएसटी खासगी कंपनीची ट्रॅव्हल (क्रमांक एम.पी. ६९ पी०९८५) अचानक समोर आली. भरधाव वेगात असलेल्या ट्रॅव्हल्सच्या समोरील भागाखाली दुचाकी अडकल्याने अंकुश चव्हाण गंभीर जखमी झाला. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली. जखमीला तात्काळ उपचारासाठी जळगाव येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

अपघातात ट्रॅव्हल्सच्या बाजूने मुख्य रस्त्यावरून भुसावळकडून जळगावच्या दिशेने जाणाऱ्या कारवरील (एम.एच. २८ बी.क्यू. ६४५५) चालकाचेही नियंत्रण सुटले. त्यानंतर ती रस्त्याच्या कडेला जाऊन थांबली. कारचालक आदित्य प्रकाश लोखंडे यांना किरकोळ दुखापत झाली. अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

ट्रॅव्हल्सचालक पोलिसांत हजर
ट्रॅव्हलचालक रुमालिया तेरसिंग सिंगर (वय ३५, रा. काबरील, जि. खरगोन) हा नशिराबाद पोलिस ठाण्यात हजर झाला आहे. मात्र सायंकाळपर्यंत नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली नव्हती. नशिराबादचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आसाराम मनोरे यांच्याशी संपर्क केला असता मृताच्या कुटुंबातील व्यक्ती फिर्याद देतील त्यावेळेस गुन्हा दाखल केला जाईल असे सांगितले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now