जळगाव लाईव्ह न्यूज । काही दिवसापूर्वी जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (विकास) दुधाच्या विक्री दरात वाढ केल्यानं ग्राहकांना दणका दिला. तर गायीच्या दुधाचे खरेदी दर न वाढल्यानं नाराजीचा सूर उमटू लागताच संघाकडून सोमवारपासून गायीच्या दुधाचे खरेदी दर वाढविण्यात आले आहेत.

गायीच्या दुधासाठी पशुपालक शेतकऱ्यांना प्रति लिटर १.२४ रूपयांची वाढ देण्याचा निर्णय जिल्हा सहकारी दूध संघाने घेतला आहे. त्यानुसार, ३.५ फॅट आणि ८.५ टक्के एसएनएफ गुणवत्तेच्या गायीच्या दुधाला ३६.२४ रूपये प्रति लिटर प्रमाणे खरेदी दर जाहीर झाला आहे. नवीन खरेदी दराची अंमलबजावणी काल सोमवारपासूनच झाली आहे. त्या संदर्भात सूचना जिल्हाभरातील प्राथमिक सहकारी दूध उत्पादक सहकारी संस्थांना देण्यात आल्याचे संकलन विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

प्राप्त माहितीनुसार, गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाकडे दररोज सुमारे २ लाख ८० हजार लिटर दूध संकलन होते. मात्र, यंदा दैनंदिन संकलन घटून सुमारे २ लाख ४६ हजार लिटरपर्यंत खाली आले आहे. सध्या संघाकडे गायीचे अंदाजे १ लाख ४६ हजार लिटर, तर म्हशीचे सुमारे एक लाख लिटर दूध संकलित होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
जिल्ह्यातील पशुपालकांकडून पुरवठा होणाऱ्या गायीच्या दुधासाठी ३.५ फॅट आणि ८.५ टक्के एसएनएफ या गुणवत्तेनुसार २७ ऑगस्टपासून प्रति लिटर ३५ रुपये दर दिला जात आहे. तर म्हशीच्या ६.० फॅट आणि ९.० टक्के एसएनएफ दर्जाच्या दुधाला एक नोव्हेंबरपासून प्रति लिटर ४८.९० रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. म्हशीच्या दुधाच्या खरेदी दरात गेल्या महिन्यात वाढ करण्यात आली असली, तरी गायीच्या दुधाच्या दरात मागील सुमारे तीन महिन्यांपासून कोणतीही वाढ झालेली नाही. याउलट खासगी दूध संघ व डेअऱ्यांकडून तुलनेने अधिक दर दिले जात आहेत. त्यामुळे पशुपालकांचा कल इतर पर्यायांकडे वाढत असून, याच कारणामुळे जळगाव दूध संघाच्या दैनंदिन दूध संकलनात अलीकडे घट झाल्याची चर्चा आहे.
अशातच गायीच्या दुधासाठी जळगाव जिल्हा दूध संघाकडून पशुपालक शेतकऱ्यांना प्रति लिटर १.२४ रूपयांची वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला असून नवीन खरेदी दराची अंमलबजावणी सोमवारपासूनच झाली आहे.






