जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जून २०२१ । शहरातील प्रजापत नगर परिसरातील माहेर असलेल्या वीस वर्षीय तरुणीचा विवाह सहा महिन्यांपूर्वी राधाकृष्ण नगरात राहणाऱ्या तरुणाशी झाला होता. शुक्रवारी दुपारी विवाहितेने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. दरम्यान, चारित्र्याच्या संशयावरून पतीने तिचा घातपात केल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला असून सासरच्या मंडळींना अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे.
प्रजापत नगरात राहणाऱ्या दुर्गा या तरुणीचा विवाह २३ डिसेंबर २०२० रोजी राधाकृष्ण नगरात राहणाऱ्या शेखर गायकवाड या तरुणाशी झाला होता. लग्नाच्या महिनाभरानंतर सासरच्या मंडळींनी तिला त्रास देण्यास सुरुवात केली. चारित्र्याच्या संशयावरून पती-पत्नीमध्ये वारंवार खटके उडत होते. शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास दुर्गा गायकवाड या विवाहितेने सासरी गळफास घेऊन आत्महत्या केली. शेखर गायकवाड यांचे खान्देशी व्हेज नावाचे हॉटेल असून पती-पत्नी दुपारी आरामासाठी घरी येतात. घटना त्याच वेळी घडली असून पतीने तिचा घातपात केल्याचा संशय तिचे वडील दत्तू आधार पाटील यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, जोपर्यंत आरोपींना अटक केली जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा विवाहितेच्या कुटुंबीयांनी घेतला आहे. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू असून सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा हे त्या ठिकाणी पोहोचले आहेत.