जळगाव लाईव्ह न्यूज । १७ नोव्हेंबर २०२५ । अमळनेर पोलिसांच्या ताब्यात असलेले आणि नंदुरबार कारागृहात नेत असलेल्या दोन सराईत आरोपींनी दोंडाईचा तालुक्यातील धावडे गावाजवळ भरदुपारी ‘चक्कर’ येत असल्याचे नाटक करून पोलिसांना बेड्या काढण्यास भाग पाडले आणि संधी साधून सरकारी वाहनातून पलायन केले. हिंमत रहिंजा पावरा (वय ३२) आणि अबिलाल ऊर्फ अंबालाल बुरड्या खर्डे (वय २७, दोघे रा. सातप्रिंप्री, शहादा) अशी त्यांची नावे आहेत. या आरोपींचा अजूनही तपास लागला असून त्यांच्या शोधासाठी पथके रवाना केली आहे. दरम्यान पोलिसांच्या या निष्काळजीपणामुळे त्यांच्यावर आता निलंबनाची वेळ आली आहे.

अमळनेर पोलिसांनी शहर व परिसरातून २४ दुचाकी चोरणारे हिंम्मत रेहंज्या पावरा व अबीलाल उर्फ अंबादास बुरड्या खर्डे रा. सातपिंप्री ता. शहादा जि. नंदुरबार याना अटक केली होती. या आरोपींची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना न्यायालयाने २८ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. जळगाव कारागृहात जागा नसल्याने आरोपींना नंदुरबार जिल्हा कारागृहात जमा करण्याचे आदेश दिले होते.

या आरोपींना नंदुरबार येथे सोडण्यासाठी अमोल पंडित करडयीकर व यशकुमार रवींद्र सपकाळे या दोघा पोलिसांना वॉरंट देण्यात आले. आरोपींना शासकीय वाहनातून नंदुरबार नेत असताना धावडे गावाच्या पुढे अंबालालने प्रकृती बिघडल्याचे नाटक करत डोळे बंद केले. पोलिसांनी हॉटेल नयन समोरील चहाच्या टपरीवर गाडी थांबवून पाण्याची बाटली आणली. अमोल करडईकर याने हाताची बेडी उघडून त्याला पाणी पाजायला सुरुवात केली. तेव्हा ते पोलिसांच्या हातावर तुरी देवून पसार झाले.
निलंबनाची कारवाई होणार
दरम्यान याबाबत पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर, डीवायएसपी विनायक कोते यांना माहिती कळवली आहे. या दोन्ही कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली जाणार असल्याचे समजते.












