जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव विमानतळावरून देशाची राजधानी नवी दिल्ली आणि मध्य प्रदेशातील इंदूर साठी स्वतंत्र विमानसेवा सुरू करण्यासाठी वेगाने हालचाली सुरू झाल्या असून जळगावच्या खासदार स्मिता वाघ यांनी या संदर्भात केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाकडे पाठपुरावा केला आहे.

जळगाव शहरातील विमानतळावरून सद्यःस्थितीत गोवा, हैदराबाद, पुणे, मुंबई शहरांसाठी विमानसेवा सुरू आहे. यासेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसादही मिळताना दिसून येत आहे. आता नवी दिल्ली आणि इंदूर शहरांना जळगावशी जोडण्यासाठी इंडिगो (IndiGo) आणि स्टार एअर (Star Air) कंपनीने विमानसेवा सुरू करावी, यासाठी खासदार स्मिता वाघ यांचा पाठपुरावा सुरू आहे. नवी दिल्लीची विमानसेवा सुरू झाल्यास जळगावच्या नागरिकांना देशाच्या राजधानीला अगदी कमी वेळात पोहोचणे शक्य होणार आहे.

तसेच जळगाव विमानतळाची सेवा अधिक सक्षम आणि गतिमान करण्याच्या दृष्टीने खासदार वाघ यांनी केंद्र सरकारकडे तांत्रिक तसेच आर्थिक मदतीची मागणी केली होती. त्यांच्या प्रयत्नानंतर विमानतळाच्या विस्तारासाठी सुमारे 30 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. या निधीतून पुढील वर्षभरात विविध विकासकामे हाती घेण्यात येणार आहेत. या कामांमुळे विमानतळाची सुविधा आणि क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.








