जळगाव लाईव्ह न्यूज । २६ ऑक्टोबर २०२५ । जळगाव-मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे आज २६ ऑक्टोबरपासून जळगाव ते मुंबई दरम्यानची विमानसेवा दररोज सुरू होणार आहे. यामुळे आता अवघ्या दीड तासात जळगावहुन मुंबई गाठता येणार आहे. याच बरोबरीने जळगावमार्गे अहमदाबाद सेवा पुन्हा सुरू केली जात आहे. त्याचसोबत जळगाव विमानतळावरून सेवा पुरवणाऱ्या विमान कंपन्यांतर्फे नवे हिवाळी वेळापत्रक जाहीर करण्यात आले. रविवारपासून (दि.२६) हे नवीन वेळापत्रक लागू असणार आहे

जळगाव विमानतळावरून उडान योजनेच्या अंतर्गत सद्यःस्थितीत गोवा, पुणे, हैदराबाद, मुंबई, अहमदाबाद या शहरांसाठी विमानसेवा सुरू आहेत. त्यामध्ये टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात येत आहे. त्याचसोबत अलायन्स एअरकडून जळगाव-मुंबई विमानसेवा याआधी आठवड्यातून चार दिवस होती. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद आणि मागणी लक्षात घेता ही सेवा दररोज करण्यात आली आहे. त्यासाठी आठवड्यातील सातही दिवसांचे दि. २६ ऑक्टोबर २०२५ ते २८ मार्च २०२६ पर्यंतचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. दरम्यान, गेले दोन महिने जळगाव-अहमदाबाद विमानसेवा बंद होती तीदेखील पुन्हा सुरू करण्यात येत आहे. यामुळे व्यापारी, उद्योजक, विद्यार्थी, नोकरदार यांच्यासह इतरांची मोठीच सोय होणार आहे.

नवे हिवाळी वेळापत्रक असे?
गोवा-जळगाव : (शनिवार वगळून सोमवार ते रविवार) दुपारी १२.१० वाजता निघून १३.५० ला पोहोचेल. शनिवारी दुपारी १४.३० निघून १६.२० मिनिटांनी जळगाव येथे पोहोचणार आहे.
जळगाव-गोवा : (सोम, मंगळ, गुरु, शुक्र, रविवार) १७.३५ ला निघून १९.२० ला पोहोचेल. बुधवार-१८.०५ ला उड्डाण भरून २०.५ वाजता गोव्यात पोहोचेल. शनिवार-रात्री २०.२५ ला जळगावातून निघून २२.२५ गोव्याला पोहोचेल.
जळगाव-पुणे : (शनिवार वगळून सोमवार ते रविवार) दुपारी १४.१० ला जळगावातून निघून दुपारी १५.३० ला पुण्यात पोहोचेल. शनिवारी सायंकाळी १६.४० वाजता उड्डाण भरून पुणे येथे १८.०० वाजता ही फ्लाइट पोहोचणार आहे.
पुणे-जळगाव : (शनिवार वगळून सोमवार ते रविवार) दुपारी १५.५० ला निघून १७.१५ ला जळगावात फ्लाइट लँड होईल. शनिवारी सायंकाळी १९.०० वाजता निघून जळगाव येथे हे विमान २०.०५ वाजता पोहोचणार आहे.
जळगाव-हैदराबाद : (दररोज) सायंकाळी १८.२५ ला निघून हैदराबाद येथे २०.४५ पोहोचेल. हैदराबाद-जळगाव (दररोज) सायंकाळी १६.२५ला हैदराबादहून विमान निघून जळगावात १८.०५ वाजता पोहोचेल असे सांगण्यात आले.
मुंबई-जळगाव- मुंबई : (मंगळवार, गुरुवार, शनिवार) या तीन दिवस रात्री ८ वाजता मुंबईहून येऊन ८.३५ वाजता फ्लाइट पुन्हा मुंबईला परतेल. सोमवार, बुधवार, शुक्रवार व रविवारी ४.२० मुंबईहून जळगावला येईल. ४.४५ ला जळगावहून अमदाबादला रवाना होईल. परत जळगावला रात्री ८ वाजता येऊन ८.२५ ला मुंबईला परत जाईल.








