मुक्ताईनगर, वरणगावच्या पेट्रोल पंपांवरील सशस्त्र दरोड्याचा पर्दाफाश ; मुद्देमालांसह ६ जणांना अटक

ऑक्टोबर 16, 2025 11:07 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर आणि वरणगाव परिसरातील पेट्रोल पंपांवर झालेल्या सशस्त्र दरोड्याचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून पोलिसांनी आंतरजिल्हा दरोडेखोर टोळीतील सहा संशयित आरोपींना अटक केली असून यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मालकीच्या पेट्रोल पंपावर दरोडा टाकणारे आरोपीही अटकेत आहेत. या दरोडेखोरांकडून एकूण १ लाख ३३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

droda

बुधवारी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ९ ऑक्टोबर रोजी रात्री १० ते ११ च्या दरम्यान बोदवड चौफुली मुक्ताईनगर येथील ‘रक्षा टोफ्युअल’, कर्की फाटा येथील ‘मनुभाई आशीर्वाद पेट्रोलपंप’ आणि वरणगाव शिवारातील ‘सय्यद पेट्रोलपंप’ या तीन ठिकाणी पाच ते सहा अनोळखी व्यक्तींनी दरोडा टाकला होता. आरोपींनी बंदुकीचा धाक दाखवून मुद्देमाल चोरून नेला होता.

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष आदेश दिले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पाच तपास पथकांनी चार दिवसांच्या अथक परिश्रमानंतर तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींचा मुक्ताईनगर, वरणगाव ते नाशिक आणि अकोलापर्यंत माग काढला. पोलिसांनी नाशिक येथून चार आरोपींना आणि अकोला येथून एका आरोपीसह एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये भुसावळ, अकोला आणि बऱ्हाणपूर येथील रहिवाशांचा समावेश आहे. अटक आरोपी सचिन भालेराव हा जिल्ह्यातून यापूर्वीच हद्दपार केलेला गुन्हेगार आहे.

पोलिसांनी दरोडेखोरांकडून ४० हजार रोख रक्कम, ३ गावठी पिस्तूल, ५ मॅगझीन, १० जिवंत काडतुसे आणि ९ मोबाईल फोन असा एकूण १ लाख ३३ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now