जळगाव लाईव्ह न्यूज । ३० सप्टेंबर २०२५ । जळगाव जिल्ह्यामधील अनेक ठिकाणी मागच्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक नाले, नद्यांना पूर आले. या पुराचे पाणी थेट शेतात शिरल्याने अनेक ठिकाणी शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले. याच दरम्यान, गिरणा नदीला आलेल्या पूराचे पाणी शेतात घुसल्याने शेकडो केळीची झाडे जमीनदोस्त झाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

जळगाव जिल्हा हा केळी पिकासाठी देखील ओळखला जात असून इथल्या केळीला देशांतर्गत आणि परदेशी बाजारपेठेत मोठी मागणी असते. त्यामुळे बहुसंख्य शेतकरी शेतात केळीचे पीक घेतात. मात्र मागच्या काही दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे हेच पीक आता त्यांच्या डोळ्यादेखत नष्ट होत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

जळगाव तालुक्यातील देवगावसह परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे केळीचे अनेक उभे खांब जमिनीवर पडले आहेत. या झाडांवरील तयार घड मातीत पुरल्याने ते सडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नुकसान झाल्यानंतर देखील पंचनाम्यासाठी अद्याप कुठलेही प्रशासकीय अधिकारी फिरकलेले नसल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली असून नुकसान मिळाली नाही, तर मी गिरणा नदीत उडी घेवून जिव देणार, अशी हताश भावना नुकसानग्रस्त शेतकऱ्याने व्यक्त केली









