Jalgaon : ऐन सणासुदीत केळीचा भाव घसरले; शेतकरी मोठ्या संकटात

सप्टेंबर 30, 2025 10:44 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० सप्टेंबर २०२५ । एकीकडे अतिवृष्टीने जळगाव जिल्ह्यात खरीप पिकांचे अतोनात नुकसान झालं असून यातच आता केळी भावात मोठी घसरण झाल्याने केळी उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. गेल्या महिन्यात २००० हजारापर्यंतचा भाव मिळत आलेल्या केळीचा आता अवघा ३०० ते ४०० रुपयांपर्यंतचा दर मिळतोय.

banana

वाढलेली आवक आणि अतिवृष्टीमुळे वाहतूक व्यवस्था ठप्प झाल्याने ही स्थिती ओढवल्याचे व्यापारी सांगत आहेत. मात्र, बाजारात केळीला मागणी असतानाही, दर कमी करण्याचे षडयंत्र व्यापारी वर्गाकडून सुरू असल्याचा आरोप केळी उत्पादक शेतकऱ्यांकडून केला जात आहे

ऑगस्टच्या सुरुवातीलाच केळी २००० रुपयापर्यंतचा दर मिळत होता. मात्र यानंतर केळी दरात सातत्याने घसरण दिसून आली. विशेष गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवात केळीला चांगली मागणी असते आणि भावही टिकून राहतात. मात्र, ऐन सणासुदीच्या काळात भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. सालाबादप्रमाणे या काळात चांगला नफा मिळेल, अशी अपेक्षा उत्पादकांना होती, पण ती फोल ठरली.

गेल्या महिन्यात २००० ते २१०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंतचा असलेला भाव आता स्थानिक बाजारात ३०० ते ४०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली आले आहेत. गुणवत्ता आणि आकारानुसार भावात चढ-उतार होत असला तरी, सरासरी भाव कोसळल्याने उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. एकीकडे केळी पिकासाठी खते, कीटकनाशके आणि मजुरी यावर केलेला खर्च खूप मोठा असतो. सध्याच्या ३०० ते ४०० रुपये प्रतिक्विंटल दरात उत्पादन खर्चही वसूल होत नाहीये. त्यामुळे अनेक शेतकरी आता झालेला खर्च कसा काढायचा, या विवंचनेत आहेत.

केळीचे घाऊक बाजारभाव कोसळले असले तरी, किरकोळ बाजारात ग्राहकांना फारसा दिलासा मिळालेला नाही. शहरांमधील किरकोळ विक्रेते आजही ४० ते ५० रुपये प्रति डझनने केळीची विक्री करत आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला मिळणारा भाव आणि ग्राहकांना होणारा विक्रीचा भाव यात मोठी तफावत दिसून येत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now