जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळ येथील तापी पुलावरून नदीत उडी घेतलेल्या तरुणाचा मृतदेह तिसऱ्या दिवशी टाकरखेडा येथून जवळच असलेल्या शेळगाव बॅरेजमध्ये आढळला. त्याने बुधवारी नदीत उडी घेतली होती.

भुसावळ शहरातील शनीमंदिर वॉर्डातील रहिवासी अक्षय नीलेश चौधरी (वय २१) याने बुधवारी भुसावळ जवळील तापीच्या पुलावरून नदीत उडी घेतली होती. तेव्हापासून त्याचा यंत्रणेकडून शोध सुरू होता. पण दोन दिवसांत काहीही उपयोग झाला नाही. यानंतर अक्षयचा मृतदेह शुक्रवारी तापी नदीवरील शेळगाव बॅरेजमध्ये आढळला.

ग्रामस्थांनी ही माहिती पोलिसांना दिली. यानंतर मृतदेह नदीतून बाहेर काढून यावल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. तेथे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातलगांना सोपवण्यात आला. या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार नरेंद्र बागुले करत आहेत.








