जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात नवरात्रीत भेट देण्यासाठी अनेक प्रसिद्ध देवी मंदिरे आहेत. ही प्रसिद्ध मंदिरे नवरात्रीच्या काळात भाविकांना आकर्षित करतात. चला तर जिल्ह्यातील प्रसिद्ध देवी मंदिरे जाणून घेऊया..

सप्तशृंगी माता
वणीच्या सप्तश्रृंगी गडावर जाण्याआधी देवीचे वास्तव्य हे शिरागड (ता.यावल) येथील या डोंगरावर होते, अशी मान्यता आहे. त्यामुळे आजही या स्थानाला देवीचे माहेर व लहानगड असे संबोधले जाते. नदीच्या तिरावरून सुमारे १५० पायऱ्या चढून मंदिराच्या प्रागंणात प्रवेश होतो. मंदिराच्या गर्भगृहात वज्रपिठावर असलेल्या सोनेरी नक्षीदार मखरात, चार फूट उंचीची, पाषाणात कोरलेली सिंहावर आरूढ देवीची मूर्ती आहे. देवीच्या १८ हातांमध्ये विविध आयुधे आहेत. त्यामुळे या देवीला ‘अष्टादश देवी’ असेही म्हणतात. डोक्यावर मुकुट, कानात कर्णफुले, नाकात नथ, गळ्यात मंगळसूत्र, पुतळ्यांचे गाठले, हातांत हिरव्या बांगड्या, कमरेला कमरपट्टा, पायात तोडे असे अलंकार आहेत.

मनुदेवी
यावल येथील सातपुडा पर्वत रांगेत मनुदेवीचे प्राचीन मंदिर आहे. मनुदेवीची आख्यायिका अशी की पृथ्वीवर दहशत माजवणाऱ्या महिषासुराचा बंदोबस्त करण्यासाठी ब्रम्हा, विष्णू आणि महेश विचार करीत असताना तेथे तीव्र प्रकाशाची ज्योत निर्माण झाली. तिच्यातून मनुदेवी अवतरली. देवतांनी जेव्हा तिला महिषासुराच्या त्रासापासून मुक्ती देण्याची विनंती केली. मनुदेवीने जेथे महिषासुराचा वध करण्याचे देवतांना अभयवचन दिले त्या स्थानी आज हे मंदिर उभे आहे. संगमरवरी पाषाणांचा वापर करून मंदिराचे सभामंडप बांधण्यात आले आहे. सभामंडपाच्या आत देवीचे गर्भगृह आहे. गर्भगृहात चांदीचा पत्रा जडवलेले सुंदर महिरपी मखर आहे. त्यात चांदीच्या अधिष्ठानावर देवीच्या दोन मूर्ती आहेत.
म्हाळसा देवी मंदिर
विष्णूचे मोहिनी रूप आणि खंडोबाची पत्नी असलेल्या म्हाळसा देवीचे प्रसिद्ध मंदिर चाळीसगाव तालुक्यातील पिंपळवाड येथे आहे. मुख्य मंदिरासमोर एक हवनकुंड आहे. सभामंडप, अंतराळ व प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. सभामंडपाच्या मध्यभागी असलेल्या एका उंच चौथऱ्यावर संगमरवरी नंदीची मूर्ती आहे. अंतराळात प्रदक्षिणामार्ग सोडून मध्यभागी मंदिराचे गर्भगृह आहे. येथे एका उंच वज्रपिठावर देवीच्या चांदीच्या पादुका आहेत. त्यापुढे म्हाळसादेवीची मूर्ती आहे. साडी–चोळी नेसवलेल्या या मूर्तीच्या डोक्यावर चांदीचा मुकूट आहे. मूर्तीच्या मागील भिंतीवर दोन वाघांची शिल्पे व देवीवर चांदीचे छत्र आहे.
माहिजी देवी
पाचोरा तालुक्यातील माहिजी हे गाव येथील जागृत माहिजी देवी मंदिरामुळे प्रसिद्ध आहे. दुर्गादेवीचे एक रूप असलेली ही देवी मनातील इच्छा पूर्ण करणारी व हाकेला धावून येणारी आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. उंच अधिष्ठानावर असलेल्या या मंदिराच्या सभामंडपात आठ पायऱ्या चढून प्रवेश होतो. सभामंडप, अंतराळ व प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृह अशी या दुमजली मंदिराची रचना आहे. गर्भगृहात माहिजी देवी व तिची बहिण यांच्या मूर्ती आहेत. केस मोकळे, नाकात नथ, कपाळावर कुंकू, गळ्यात दागिने असे या मूर्तीचे स्वरूप आहे. त्या मूर्तीच्या खालच्या बाजूला एक सोनेरी मुखवटा परिधान केलेली दुसरी मूर्ती आहे. तिच्या ही नाकात नथ, गळ्यात दागदागिने व कपाळावर कुंकू आहे.
चंडिकादेवी (पाटणादेवी)
चाळीसगाव तालुक्यातील पाटण या गावानजीक जंगल परिसरात चंडिकादेवीचे (पाटणादेवी) प्रसिद्ध स्थान आहे. वणी येथील सप्तश्रृंगी देवीची बहिण अशी मान्यता असलेल्या या देवीचे हे मंदिर बाराव्या शतकातील आहे. हेमाडपंती शैलीतील हे मंदिर ७५ फूट लांब, ३६ फूट रुंद व १८ फूट उंच आहे. सभामंडप व देवीच्या मुख्य गर्भगृहासह आणखी दोन उपगर्भगृहे अशी या मंदिराची संरचना आहे. सभामंडपात अनेक दगडी स्तंभ आहेत. मुख्य गर्भगृहात वज्रपिठावर नऊ फूट उंचीची व्याघ्रारूढ चंडिकादेवीची मूर्ती आहे. या मूर्तीला अठरा हात आहेत. यापैकी अनेक हातांमध्ये आयुधे आहेत. या मूर्तीच्या एका बाजूला गणपती व दुसरीकडे देवीची मूळ मूर्ती आहे.
मुधाई देवी
चाळीसगाव–भडगाव या राष्ट्रीय महामार्गावर तितूर नदीकाठी वाघळी येथे मुधाई देवीचे प्राचीन व प्रसिद्ध मंदिर आहे. शिल्पसौंदर्याचा खजिना असलेले हे भूमिज शैलीतील मंदिर बाराव्या शतकातील आहे. मंदिराच्या गर्भगृहाच्या बाह्यभिंतीतील देवकोष्टकात एक अतिशय सुंदर असे सूर्यशिल्प कोरलेले आहे. मंदिराच्या प्रांगणात परिसरात उत्खननात सापडलेल्या अनेक मूर्ती व शिल्पे आहेत. मुधाई देवीच्या मंदिरासमोर एक हवनकुंड आहे. पूर्वाभिमुख असलेल्या मुधाई मंदिराचा पाया ताऱ्याच्या आकाराचा आहे. मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. मुखमंडपाप्रमाणेच सभामंडपात व अंतराळातही नक्षीदार दगडी स्तंभ आहेत. अशा एकूण २४ स्तंभांवर मंदिराचा भार तोललेला आहे. गर्भगृहात एका पाषाणी वज्रपिठावर मुधाई देवीची तांदळा स्वरूपातील मूर्ती आहे.







