जळगाव लाईव्ह न्यूज । २५ सप्टेंबर २०२५ । मागच्या काही दिवसात झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांशी लहान मोठे धरणे क्षमतेने भरले आहे. यातच यावल तालुक्यातील सावखेडासिम गावाजवळील प्रसिद्ध निंबादेवी धरण ओव्हरफ्लो झालं असून धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले. यामुळे पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र जर तुम्हीही निंबादेवी धरणावर जाण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्या अत्यंत कामाची आहे.

निंबादेवी धरणाच्या सांडव्याच्या भिंतीला तडा गेल्याने ती कोसळण्याची भीती प्रशासनाने व्यक्त केली. ही स्थिती पाहता दुर्घटना रोखण्यासाठी तहसीलदारांनी निंबादेवी धरण परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले. वन विभाग व पोलिसांनी बंदोबस्तदेखील लावला आहे. ज्यामुळे आता पर्यटकांना धरणावर प्रवेश बंदी घालण्यात आली आहे.

निंबादेवी धरण हे जळगावच्या यावल तालुक्यातील सावखेडासिम गावानजीक व सातपुडा पर्वतरांगेत वसलेले एक निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे, जे विशेषतः पावसाळ्यात पर्यटकांना आकर्षित करते. सांडवास्थळी पायऱ्यांवरून वाहणारे पाणी जिल्हाभरातील पर्यटकांना आकर्षित करून घेते. मात्र, यंदा सातपुड्यात अल्प पावसाने धरण भरायला २२ सप्टेंबरपर्यंत वाट पाहावी लागली. दोन दिवसापूर्वीच सांडव्यावरून पाणी वाहण्यास सुरुवात झाली.
पण, धरणाच्या मुख्य भिंतीपासून सुमारे ५०० मीटर लांब अंतर व खालील बाजूने असलेल्या सांडव्याच्या भिंतीला तडा गेल्याचे समोर आले. यामुळे सांडव्याची भिंत कोसळण्याची शक्यता निर्माण झाली. ही माहिती मिळताच तहसीलदार नाझीरकर यांनी पाटबंधारे विभागाला खबरदारीच्या सूचना देत निंबादेवी धरण परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले. यानंतर पोलिस व वन विभागाने या ठिकाणी बंदोबस्त लावला. ज्यामुळे पर्यटकांना धरणावर प्रवेश बंदी घालण्यात आली आहे.
निंबादेवी धरण प्रेक्षणीय एक पर्यटन स्थळ झालेल्या असल्याने येथे जिल्हाभरातीलच नव्हे तर मध्य प्रदेशातील काही ठिकाणचे लोक निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी किंवा तेथील नयनरम्य दृश्य बघण्यासाठी येतात व आनंद घेतात. निसर्गरम्य अशा धरणासाठी प्रशासनाची धावपळ असते. भिंत कोसळल्याचे वृत्त कळताच धरण परिसर प्रतिबाधित क्षेत्र म्हणून यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी जाहीर केले आहे
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून धरण भरत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली होती. पण आता परतीच्या पावसामुळे निंबादेवी धरण भरले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे. धरणाची पूर्ण पातळी दोन पॉईंट ४२८ दशलक्ष घनमीटर आहे. त्यामुळे या धरणापासून चुंचाळे, नायगाव, सौखेडासीम, नावरे, बोराळे, विरावलीसह यावलपर्यंत शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.












