जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात भाजपची संघटनात्मक मांडणी नेहमीच चर्चेत राहते. कारण हा जिल्हा केवळ मतदारसंख्येच्या दृष्टीनेच नाही तर राजकीय वजनाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा मानला जातो. राज्यातील बड्या नेत्यांपैकी एक मानले जाणारे मंत्री गिरीश महाजन यांचा हा जिल्हा असल्याने संघटनात्मक फेरबदलाकडे साऱ्यांचे लक्ष लागलेले होते.

काही दिवसांपूर्वीच भाजपने पश्चिम जिल्हाध्यक्षपदी डॉ. राधेश्याम चौधरी, पूर्व जिल्हाध्यक्षपदी चंद्रकांत बाविस्कर आणि महानगर जिल्हाध्यक्षपदी दीपक सूर्यवंशी यांची नियुक्ती केली. या निवडीमागे जातीय व सामाजिक समतोल साधण्याचा प्रयत्न स्पष्ट दिसतो. बाविस्कर आणि सूर्यवंशी हे मराठा समाजाचे आहेत तर चौधरी हे गुर्जर समाजाचे प्रतिनिधित्व करतात. अशा प्रकारे दोन मराठा व एक गुर्जर या फॉर्म्युल्यावर जातीय समीकरण बसवले गेले. याचे पुढचे पाऊल टाकत डॉ. राधेश्याम चौधरी यांनी पश्चिम जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली. त्यामागे त्यांनी पूर्वी लोकसभा क्षेत्र प्रमुख म्हणून केलेल्या कामाचा अनुभव वापरला आहे. कार्यकारणीत भाजपने ‘नवीन पिढीला संधी’ आणि ‘शिक्षणावर भर’ या दोन मुद्द्यांवर संघटनेला नवी ओळख देण्याचा प्रयत्न केला आहे.

तरुण आणि अनुभवींचा मेळ
भाजपने तरुणांना संधी दिली आहे, परंतु संघटनेला गती देण्यासाठी अनुभवी कार्यकर्त्यांनाही स्थान दिले आहे. यामुळे भविष्यातील नेतृत्व घडवणे आणि विद्यमान बळ टिकवणे दोन्ही साधले गेले आहे.
शिक्षणाचा दर्जा
२६ पैकी तब्बल १८ पदाधिकारी हे पदवीधर किंवा पदव्युत्तर शिक्षित आहेत. यावरून भाजप उच्चशिक्षित नेतृत्व पुढे आणून संघटनेला विचारसंपन्नतेची धार देण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते.
स्थानिक नेतृत्वाचा सहभाग :
कार्यकारिणीत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कामगिरी सिद्ध केलेल्या चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे पालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये प्रभावी नेतृत्व उभे राहण्याची तयारी आहे.
महिला प्रतिनिधित्व वाढवले :
संघटनेतील महिलांची टक्केवारी वाढवण्यात आली आहे. हा बदल भविष्यातील पालिका निवडणुकांतील महिला आरक्षणाच्या जागांसाठी संघटना मजबूत करण्याचा संकेत मानला जातो.
जातीय व सामाजिक समिकरण :
मराठा समाजाला झुकते माप देत असताना एससी, एसटी, एनटी, ओबीसी, व्यापारी, व्यावसायिक, वकील अशा विविध समाजघटकांना प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. यामुळे संघटना एकाच जातिविशिष्ट चौकटीत मर्यादित न राहता सर्वसमावेशक होण्याचा प्रयत्न आहे.
भौगोलिक संतुलन :
जिल्ह्यातील विविध तालुके आणि भागांचा समतोल साधून कार्यकारिणी रचली गेली आहे. त्यामुळे ग्रामीण-शहरी मतदारसंघ दोन्हींचे प्रतिनिधित्व होते.
एकंदरीत जळगाव महापालिका, तसेच पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊनच ही संघटनात्मक मांडणी केली आहे. याचा फायदा येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपाला कितपत फायदा होईल ? याचे उत्तर आगामी काळातच मिळेल…!








