जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑगस्ट २०२५ । मागच्या काही दिवसापासून होत असलेल्या पावसामुळे महाराष्ट्रातील अनेक धरणे चांगल्या प्रमाणात भरली असून, काही धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत, ज्यामुळे पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे.

दरम्यान, उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे व खान्देशसाठी वरदान ठरलेल्या गिरणा धरणातील जलसाठा ८३.९० टक्क्यांवर पोहचला असून पावसाचे चित्र पाहता लवकरच हे धरण सलग दुसऱ्या वर्षी शतक गाठण्याच्या स्थितीत आहे. गिरणेच्या पाण्यामुळे रब्बी हंगामाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

गतवर्षी २८ ऑगस्ट रोजी गिरणा धरणातील जलसाठा ९३ टक्क्यांवर पोहोचल्याने दोन वर्षानंतर धरणाचा एक दरवाजा उघडून विसर्ग सोडण्यात आला होता. यावर्षीही सलग दुसऱ्या वर्षी धरण शंभरीकडे जात आहे.
गिरणा धरण भरलेले असणे हे जळगाव जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. गिरणा धरण नाशिकमधील मालेगाव, मनमाडसह जळगावमधील चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, धरणगाव, एरंडोल, जळगाव आदी भागासाठी लाभदायी आहे. गिरणा धरणातून जळगाव जिल्ह्यातील अनेक गावांना पिण्यासाठी पाणी मिळते आणि त्याचबरोबर शेतीसाठी सिंचनाचा लाभ होतो. ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंद पसरतो








