जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑगस्ट २०२५ । जळगाव शहरासह जिल्ह्यात अपघाताच्या घटना काही कमी होताना दिसत नसून अशातच ओव्हरटेकच्या प्रयत्नात दोन ट्रक समोरासमोर धडकून दोन्ही ट्रकचे चालक ठार झाल्याची घटना शहराबाहेरून जाणाऱ्या नवीन पाळधी-तरसोद बायपासवर घडलीय. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. एस.के. मौलाली (४०, रा. एरुपालम, जि. खंमत, तेलंगणा) असे एका मृत चालकाचे नाव असून दुसऱ्याचे नाव समजू शकले नाही. एका ट्रकचा क्लिनर गंभीर जखमी झाला आहे. अपघातामुळे बायपासवरील वाहतूक पाऊण तास खोळंबली होती.

बहुप्रतीक्षित पाळधी-तरसोद मार्ग नुकताच वाहतुकीस खुला झाला असून, अवजड वाहने त्यावरून धावताना दिसत आहेत. सध्या एका बाजुने प्रायोगिक तत्वावर वाहतूक सुरू असताना बुधवारी सायंकाळी दोन मालमोटारींची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला.अपघातग्रस्त मालमोटारींपैकी एक मोटार गुजरात राजातील मोरबी येथून आंध्र प्रदेशातील खाकीनाडाकडे टाईल्स घेऊन जात होती. तर समोरून धडकलेल्या मोटारीत कोळसा भरलेला होता.

दोन्ही मालमोटारींची धडक एवढी जोरात होती, की कोळशाने भरलेली मालमोटार आणि दुसऱ्या बाजुने आलेल्या टाईल्सने भरलेल्या मालमोटारीच्या कॅबिनचा पार चुराडा झाला. दोन्ही मालमोटारीच्या चालकांचा जागीच मृत्यू झाला. तर ट्रकचा क्लिनर अडकले होते. जेसीबीने केबिनचा पत्रा दूर करून त्यांना बाहेर काढण्यात आले.
जखमीला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघातामुळे बाह्यवळण महामार्गावर जवळपास पाऊणतास वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान, दोन्ही अपघातग्रस्त वाहनांमधील कोळसा तसेच टाईल्स खाली करण्यासाठी बराच वेळ लागला. त्यानंतर कुठे बाह्यवळण महामार्गावरील ठप्प झालेली वाहतूक सुरळीत झाली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.







