डॉक्टरांच्या अंगाला चिकटल्या वस्तू
जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जून २०२१ । जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात चक्क अंगाला वस्तू चिकटायला लागल्या. थेट डॉक्टरांच्या देखील शरीराला नाणी, लाकूड चिटकले, नेमका प्रकार काय सुरू होता? हे पाहण्यासाठी गर्दी झालेली होती… अखेर यावर पडदा टाकून महाराष्ट्र अंनिस व मविपने या चमत्कारामागील विज्ञान सांगून जनजागृती केली.
कोव्हीड १९ प्रतिबंधक कोव्हीशिल्डच्या दोन्ही लस घेतल्यानंतर काही दिवसांनी शरीरात मॅग्नेट सिस्टीम तयार होते व वस्तू चिकटतात,असा दावा नाशिक येथील वयोवृद्ध गृहस्थाने केल्यानंतर महाराष्ट्रात, भारतात व विदेशातही कहर माजला. मंगळवारी १५ जून रोजी जळगाव शाखेच्या मअंनिस व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने अधिष्ठाता कार्यालयासमोर मॅग्नेट मॅनचा फोलपणा सिद्ध करण्यासाठी जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. दिगंबर कट्यारे व मराठी विज्ञान परिषदेचे सचीव दिलीप भारंबे यांनी सप्रयोगाने सिद्ध केले. यावेळी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे व डॉ.अरुण कसोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रशांत देवरे, उप वैद्यकीय अधीक्षक डॉ.संगीता गावित व डॉ.विलास मालकर, प्र.प्रशासकीय अधिकारी डॉ.जितेंद्र सुरवाडे आदी उपस्थित होते. प्रस्तावना जिल्हा समन्वयक विश्वजीत चौधरी यांनी केली.
यावेळी अंनिसचे जिल्हा समन्वयक विश्वजीत चौधरी व मिनाक्षी चौधरी यांनी सहभाग नोंदविला. यावेळी महाविद्यालयातील डॉक्टर, परिचारिका, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
चुंबकत्व सिद्धांत दावा फोल कसा ठरवता येतो?
१) प्रथम जी लस घेतली जाते ती ०.5ml असते.त्यात लोखंडाला आकर्षण करणारा फेरोमॅग्नेट यासारखे कण नसतात.म्हणजे लोखंडाला आकर्षण करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
२) दुसरी गोष्ट म्हणजे मॅग्नेट मॅनने स्टेनलेस स्टीलचे चमचे,नाणी,ताट,वाटी यासारखे पदार्थ चिकटवले होते.पण लाकूड, प्लास्टिक यासारखे पदार्थ देखील चिकटतात.या पदार्थांमध्ये लोखंड नसते तरीही ते चिकटतात.चुंबक फक्त लोखंडाला आकर्षित करतो हे आपण विज्ञानात शिकलो.
मग आता प्रश्न आहे की हे पदार्थ शरीराला कां चिकटतात?
नंबर एक जर शरीरात चुंबकत्व असेल तर ते आपल्याला सहज सिद्ध करता येते.प्रयोगशाळेत चुंबकसूची असते,ती नेहमीच उत्तर दक्षिण दिशेला स्थिर असते.तीला चुंबकाजवळ नेल्यास ती हलते.मग आपण ही चुंबकसूची त्या दावा करणाऱ्या मॅग्नेट मॅनजवळ नेल्यास हा दावा तपासता येईल.
पण वस्तू कां चिकटतात?
पहिली गोष्ट त्या व्यक्तीचे अंग गुळगुळीत असावं,रबरासारखे मऊ असावं, केस नसावे,अशा व्यक्ती हा प्रयोग सहज करू शकतात.आपल्या शरीरातून त्वचेतून घाम श्रवतो,त्यात सिबम नावाचे तेलकट,घामट द्राव श्रवतो.या द्रवातील रेणूंचा विषम पदार्थाशी संपर्क आल्यास विषम आकर्षण (adhesive force) या वैज्ञानिक नियमानुसार हे दोन्ही विषम पदार्थ आकर्षिले जातात व बाहेरील पदार्थ घट्ट बसतो, एक बंध तयार होते.घर्षणामुळे अंगाला चिकटून राहतात. याला आपण चुंबकत्व म्हणाल तर विज्ञानाची हारच आहे.
मॅग्नेट मॅनचे प्रयोग जगात यापूर्वी अनेक देशांमध्ये झाल्याच्या नोंदी आहेत.पण चिकित्सा करुन ते फोल ठरवले गेलेत.
जेम्स रॅंडी या जागतिक प्रख्यात चिकित्सकाने एका व्यक्तीने टेबलचा टाॅप छातीला चिकटण्याचा दावा केला होता,तो दावा रॅंडीने हाणून पाडला.रॅंडीने त्या व्यक्तीच्या शरीरावर टाल्कम पावडर चोपडली असता तो टेबलचा टाॅप चिकटवू शकला नाही.कारण पावडरमुळे शरीरावरील सिबम द्राव शोषली जाऊन त्वचेचे घाम श्रवणारी छिद्रे बंद होऊन तेलकट द्राव स्रवत नाही हे सिद्ध होते.