जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑगस्ट २०२५ । गेल्या काही दिवसापूर्वी पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या जलपातळीत वाढ झाल्याने हतनूरचे यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच ४१ पैकी ३० दरवाजे उघडण्याची वेळ नुकतीच आली. ज्यामुळे तापी नदी दुथडी भरून वाहत होती. मात्र आता पावसाचा जोर कमी झाला असून त्यामुळे अवाक कमी झाल्यानं धरणाचे बहुतेक दरवाजे बंद करण्यात आले आहेत. सध्या फक्त चार दरवाजे पूर्णपणे उघडे ठेवण्यात आले असून ज्या माध्यमातून शनिवारी सकाळी सांडव्यातून २२ हजार ८४९ क्यूसेकने विसर्ग सुरू होता.

जळगाव जिल्ह्यात महिनाभरापासून पावसाने दडी मारलेली असली तरी पाणलोट क्षेत्रात अधूनमधून पाऊस होत असल्याने एकमेव हतनूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याचे दिसत होते. दरम्यानच्या काळात पाण्याची आवक थोडी कमी झाल्याने हतनूरचे बहुतांश दरवाजे बंद करून केवळ दोन दरवाजे अर्धा मीटरने उघडे ठेवण्यात आले.

मात्र, गेल्या आठवडाभरात पाण्याची आवक पुन्हा वाढल्याने हतनूरचा उपयुक्त पाणी साठा झपाट्याने वाढताना दिसून आला. पाटबंधारे विभागाला त्यामुळे २४ दरवाजे पूर्णपणे आणि सहा दरवाजे एक मीटरने उघडून पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागला. यथावकाश पावसाचा जोर कमी झाल्यानंतर हतनूरचे बहुतांश दरवाजे आता बंद करण्यात आले आहेत.सध्या फक्त चार दरवाजे पूर्णपणे उघडे ठेवण्यात आले आहेत. ज्या माध्यमातून शनिवारी सकाळी सांडव्यातून २२ हजार ८४९ क्यूसेकने विसर्ग सुरू होता.
याशिवाय, कालव्यातून १०० क्यूसेकचा विसर्ग केला जात होता. पाण्याची आवक कमी झाल्यास किंवा वाढल्यास धरणाच्या दरवाजांची स्थिती पुढील काळात बदलली जाऊ शकते, असे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान, हतनूरचा विसर्ग घटल्याने शेळगाव बॅरेजच्या विसर्गावरही आता परिणाम झाला आहे. शनिवारी सकाळी या बॅरेजचे चार दरवाजे एक मीटरने आणि नऊ दरवाजे दीड मीटरने उघडे होते. ज्या माध्यमातून २५ हजार ७८० क्यूसेकने विसर्ग सुरू होता.








