खुनाच्या दोन वेगवेगळ्या घटनांनी जळगाव जिल्हा हादरला

ऑगस्ट 19, 2025 10:35 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑगस्ट २०२५ । जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारी डोकंवर काढू लागले असून जिल्ह्यात एकाच दिवसात दोन खुनाच्या घटना घडल्या. जळगाव शहर व मुक्ताईनगर तालुक्यातील लालगोटा येथे अवघ्या सहा तासांच्या अंतरावर खुनाच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्याने जिल्हा हादरला आहे. यामुळे जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे

murder raver

लालगोटा (ता. मुक्ताईनगर) येथे राणा मनमुसदार पवार (४५) यांचा भाऊबंदकीतील वादातून खून झाला तर, जळगाव शहरात जुन्या वादातून २६ वर्षीय विशाल ऊर्फ विक्की रमेश मोची या युवकाची निघृण हत्या करण्यात आली.

याबाबत असे की, लालगोटा (ता. मुक्ताईनगर) येथे रविवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास एका वस्तीत राणा मनमुसदार पवार याचा भाऊबंदकीत वाद झाला. या वादाचे पर्यावसान मारहाणीत झाले. त्यात कुन्हाडी, लोखंडी रॉड आणि आसारींचा वापर झाला. यात राणा पवार याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यातच त्यांचा मृत्यू झाला.याप्रकरणी मयत राणा पवारची पत्नी मीनाक्षी पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयितांविरुद्ध मुक्ताईनगर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात संशयित गुरुदीप जिलीशबाबू पवार, राजेंद्रबाबू सिगरेटबाबू पवार, क्रिश राजेंद्रबाबू पवार, लताबाई शक्तीकपूर पवार, अनुलेखा दीपक पवार या पाच जणांना पोलिसांनी रात्रीच अटक केली तर, पाच ते सहा जण फरार आहेत.

दुसरीकडे जळगाव शहरात जुन्या वादातून २६ वर्षीय विशाल ऊर्फ विक्की रमेश मोची या युवकाची निघृण हत्या करण्यात आल्याची घटना सोमवारी पहाटे ३ वाजता दीक्षित वाडीतील महावितरण कार्यालयाजवळ घडली. वाढदिवसाची पार्टी करणाऱ्या ६ ते ७जणांनी धारदार शस्त्रांनी विशालवर हल्ला केला. या प्रकरणी मयत विशालच्या भावाच्या फिर्यादीवरुन जिल्हापेठ पोलीस ठाण्यात भूषण अहिरे, पवन बाविस्कर आणि आकाश ठाकूर या तिघांसह इतर ३ ते ४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now