जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑगस्ट २०२५ । जळगाव शहरात एका महाविद्यालयाच्या परिसरात सुरू असलेल्या कॅफे कॉलेज कट्टावर रामानंदनगर पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी एकूण १४ तरूण आणि तरूणी कॅफेमध्ये गैरकृत्ये करताना आढळून आले. तरूणांसह तरूणींना ताब्यात घेऊन पालकांसमक्ष समज देऊन सोडून दिले.तर या प्रकरणी पोलिसांनी कॅफे चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना एका महाविद्यालयाच्या परिसरात सुरू असलेल्या कॅफेमध्ये काही तरूण-तरूणी गैरकृत्ये करत असल्याची माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने गुन्हे शोध पथकाला शहरातील त्या कॅफेची तपासणी करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. तपासणी दरम्यान पोलिसांना रामानंदनगर ठाण्याच्या हद्दीत एका गाळ्यामध्ये सदरचा कॅफे सुरू असल्याचे आढळून आले. तरूण-तरूणींना गैरकृत्ये करण्यास मोकळीक देण्यासाठी कॅफेच्या आतमध्ये प्लायवूडचे कप्पे तयार करून पडदे लावलेले होते. आतमध्ये बसण्यासाठी छोटे सोफे देखील ठेवले होते.

रामानंदनगर पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी एकूण १४ तरूण आणि तरूणी कॅफेमध्ये गैरकृत्ये करताना आढळली. पोलिसांनी त्यांची चौकशी करून पालकांना बोलावले आणि त्यांना समज देऊन सोडून दिले. पोलिसांनी कॅफेची कसून तपासणी केली असता तिथे कॉफी तयार करण्यासाठी लागणारे कोणतेही कॉफी पावडर, साखर, गॅस इत्यादी साहित्य आढळून आले नाही.
तसेच कॅफेसाठी आवश्यक असलेला परवानाही चालकाकडे नव्हता. यामुळे पोलिसांनी अनाधिकृत कॅफेच्या नावाखाली गैरकृत्यांसाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल कॅफे चालक मुकेश वसंत चव्हाण (३०, रा. रोटवद, ता. जामनेर) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला.पुढील तपास जितेंद्र राठोड करत आहेत.









