⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | भुसावळ | पिस्टल हाताळताना गोळी सुटली ; खडक्यातील अल्पवयीन जखमी

पिस्टल हाताळताना गोळी सुटली ; खडक्यातील अल्पवयीन जखमी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भुसावळ तालुक्यातील खडका येथे तिघे मित्र एका जागेवर बसले असतानाच अल्पवयीनाने आपल्याजवळील गावठी पिस्टल काढताना त्यातून गोळी सुटल्याने ती डाव्या पायाच्या मांडीवर लागल्याने मोठा रक्तस्त्राव झाल्याची घटना गुरुवारी रात्री 10 ते 10.30 दरम्यान ही घटना घडली. 

हे प्रकरण वाढून आपल्यावर गुन्हा दाखल न होण्यासाठी मित्रांनी या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा निर्णय घेत खडका मिलजवळ तीन संशयीतांनी लूट करण्याचा प्रयत्न केला मात्र ऐवज न दिल्याने संशयीताने गोळीबार केल्याची माहिती तालुका पोलिसांना रात्री उशिरा दिली. 

या प्रकाराने पोलिस यंत्रणा पुरती हादरली व कामाला लागली. जखमीला तातडीने उपचारार्थ गोदावरी रुग्णालयात हलवण्यात आले तर जखमी व त्याच्यासोबत असणार्‍यांनी दिलेल्या घटनास्थळावर अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी व पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे व सहकार्‍यांनी धाव घेत स्पॉट व्हेरीफिकेशन केले असता तेथे रक्ताचे डाग वा काही अप्रिय घडले नसल्याचे दिसून आल्याने पोलिसांचा संशय बळावला व जखमीसोबत असलेल्या मित्रांची खोलवर चौकशी केल्यानंतर त्यांनी लूट झाली नसल्याची कबुली देत घडल्या प्रकाराची कबुली दिली.

तालुका पोलिसांना लूट झाली नसताना पोलिसांना खोटी माहिती देवून प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चेतन सपकाळे, पवन सपकाळे, सचिन सपकाळे व सुरज कोळी यांना शुक्रवारी अटक करण्यात आली. संशयीतांनी अल्पवयीनाकडून पिस्टल हातळतांना गोळी सुटल्याची कबुली दिली आहे. संशयीताने हे पिस्टल कुठून व कोणत्या उद्देशाने आणले? याचा खोलवर तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे. पोलिसांना खोटी माहिती दिल्याप्रकरणी अल्पवयीन तरुणासह वरील चार संशयीतांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. जखमी अल्पवयीनावर उपचार सुरू असून अन्य चौघा सज्ञान आरोपींना अटक करण्यात आल्याचे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी शुक्रवारी पत्रकार परीषदेत सांगितले.

पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, सहा.पोलिस अधीक्षक अर्चित चांडक, प्रभारी निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक अनिल मोरे, सहा.निरीक्षक गणेश धुमाळ, सहा.निरीक्षक अमोल पवार व कर्मचार्‍यांनी आरोपींना पकडन्यात कारवाई केली.   

भुसावळ शहर व तालुक्यात पोलिसांची दिशाभूल करून खोटा गुन्हा दाखल करणार्‍यांची यापुढे देखील गय केली जाणार नसल्याचे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले . मूळ घटना लपवून त्याला दुसर्‍या घटनेचे स्वरूप देण्याचा प्रकार तालुक्यातील खडका येथे उघड झाला असून पोलिसांना खोटी माहिती देणार्‍यांना आरोपी करण्यात आल्याचेही  वाघचौरे यांनी सांगितले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.