जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जुलै २०२५ । एकीकडे महिलांसह मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच जळगावमधून तरुणीवर झालेल्या अत्याचाराची खळबळजनक घटना समोर आलीय. ज्यात सोशल मीडियावर ओळख झालेल्या शिरपूर (धुळे) येथील तरुणीला जळगावी बोलवून तिच्यावर नेरीच्या तरुणाने अत्याचार केला. याबाबत शनिवारी रामानंद नगर पोलिसात अमोल राठोड (रा. नेरी, ता. जामनेर) या संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, पीडिता तिची मोठी बहिण व आईसोबत शिरपुरला राहते. दहावीनंतर सोशल मीडियावर तिची अमोलशी ओळख झाली. दोन वर्षापासून ते संपर्कात होते. अमोलने बुधवारी (९ जुलै) दुपारी ३ वाजता तिला फोन करून जळगावला बोलावले. तिला घेण्यासाठी अमोल हा मित्रासह बस स्टॅण्डवर आला होता.

नंतर तो तरुणीला मित्राच्या घरी घेऊन गेला. मित्र व त्याची पत्नी कामानिमित्त बाहेर गेले असता, अमोल हा तरुणीशी जबरदस्ती करू लागला. मात्र, तरुणीने त्यास नकार दिला. त्याच दिवशी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास तो तिला भाड्याने घेतलेल्या खोलीवर घेऊन गेला. तेथे तरुणीवर त्याने अत्याचार केला. त्यानंतर, तरुणीला मित्राच्या घरी सोडून तो तेथून निघून गेला. तरुणीने तिच्या मैत्रिणीला कळविले. तरुणीचे नातेवाईक हे जळगावात आले व तिला शिरपूर येथे घेऊन गेले. तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून अमोल राठोड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोउनि. संजय तडवी करीत आहेत.







