जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जुलै २०२५ । जळगावसह राज्यातील अनेक ठिकाणी पावसाचा जोर ओसरला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र निवळल्यानंतर किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा देखील विरून गेला. त्यामुळे राज्यात गेल्या काही दिवसांपासून असलेला पावसाचा जोर ओसरला आहे. पाऊस ओसरताच उकाडा वाढू लागला आहे.

दरम्यान पुढील दोन ते तीन दिवस विदर्भातील काही जिल्हे वगळता अन्यत्र पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडतील, असा अंदाज आहे. आज जळगाव जिल्ह्याला मध्यम पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आला.

येत्या ४८ तासांत कोकण, गोवा, विदर्भात बऱ्याच तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडतील. १२ जुलै रोजी पुणे जिल्ह्यातील घाट विभागात पावसाच्या मध्यम सरी पडतील. जालना, जळगाव, छत्रपती संभाजीनगर येथील तुरळक ठिकाणी आणि विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाच्या मध्यम सरी पडतील. राज्यात १५ जुलैपर्यंत पावसाचा जोर कमी असणार आहे, असा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे.
दरम्यान, जुलै महिन्याचे ११ दिवस संपले, तरीही जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर पाहायला मिळाला नाही. मागचे गेले काही दिवस जिल्ह्यात पावसाचे ढग दाटून होते. मात्र अनेकवेळा पावसाने उलकावणी दिली.जिल्ह्यात मुसळधार पावसाची प्रतीक्षा अद्यापही आहे,. सध्या पावसाचा जोर ओसरल्याने जळगावात उकाडा वाढला आहे. आज हवामान खात्याने जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट दिला आहे








