जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जुलै २०२५ । अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात काम करणारी एक आदर्श विद्यार्थी संघटना आहे. 9 जुलै 1949 रोजी विद्यार्थी परिषदेची स्थापना झाली, त्यानंतर विद्यार्थी परिषदेने कधीही मागे न बघता राष्ट्रवादी विचारांची युवा पिढी घडवण्याचं अविरत काम गेल्या 76 वर्षांपासून केलं आहे. लोकशाही विरोधात लावलेली आणीबाणी असो, राम मंदिर आंदोलन असो, कश्मीरचा प्रश्न असो अथवा भ्रष्टाचार विरोधी आंदोलन असो — अशा अनेक राष्ट्रीय प्रश्नांवर विद्यार्थी परिषदेने वेळोवेळी राष्ट्रहिताची भूमिका घेतली आणि देशातील युवाशक्तीला जागृत करण्याचं कार्य केलं आहे. अशा अनेक सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात निर्माण झालेल्या प्रश्नांवर उत्तर शोधण्याचं काम विद्यार्थी परिषद करत आली आहे. या कार्यात वेळोवेळी अनेक कार्यकर्त्यांनी आपले मोलाचे योगदान दिले आहे.

विद्यार्थी परिषदेच्या या वाटचालीत प्रा. यशवंतराव केळकर यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे राहिले आहे. त्यांनी विद्यार्थी परिषदेच्या कार्याला एक विशिष्ट वळण देत आदर्श कार्यपद्धती निर्माण केली. आज विविध क्षेत्रांमध्ये नावाजलेल्या अनेक व्यक्तिमत्त्वांचे श्रद्धास्थान म्हणजे यशवंतराव केळकर होत. 2025 हे वर्ष त्यांच्या जन्मशताब्दीचे तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेच्या शताब्दीचे वर्ष आहे.

या दुर्मिळ संधीचे औचित्य साधून, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांतील आपल्या महाविद्यालयीन जीवनात संघ विचारांच्या विद्यार्थी परिषदेचे काम केलेल्या पूर्व कार्यकर्त्यांचं एक विशेष एकत्रिकरण उद्या, दिनांक 12 जुलै 2025 रोजी जळगाव येथील छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात आयोजित करण्यात आले आहे.
या दिवसभराच्या एकत्रिकरण कार्यक्रमात वर्तमान विद्यार्थी परिषद विविध आयाम आणि गतिविधींमधून करत असलेल्या कामांची आणि उपक्रमांची माहिती दिली जाणार आहे. विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांनी स्थापन केलेल्या सामाजिक संस्थांची माहितीही यावेळी मांडण्यात येणार आहे. गटचर्चांच्या माध्यमातून संघ शताब्दी वर्षानिमित्त राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमध्ये आपली कार्यकर्ता म्हणून भूमिका काय असावी, यावरही सविस्तर चर्चा होणार आहे.
कार्यक्रमाचा समारोप ‘प्रिय यशवंतराव’ या यशवंतराव केळकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित दृकश्राव्य कार्यक्रमाने होणार आहे.
या एकत्रिकरणासाठी वेळोवेळी विद्यार्थी परिषदेत कार्य केलेल्या सर्व माजी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जळगाव विभाग प्रमुख श्री. राहुल कुलकर्णी आणि धुळे विभाग प्रमुख श्री. अमोल मराठे यांनी केले आहे.









