जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या निर्णयाविरोधात जिल्हा इंडियन मेडिकल असोसिएशनवतीने ११ जुलै रोजी एकदिवशीय आरोग्य सेवा बंद ठेवण्याचे जाहीर केले आहे. मात्र, आपात्कालीन सेवा सुरु ठेवण्याचा निर्णय संघटनेच्यावतीने घेण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना देण्यात आले.

आयएमएतर्फे महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या ३० जून रोजी जारी केलेल्या अधिसूचनेचा निषेध करण्यात आला. या अधिसूचनेनुसार केवळ एक वर्षांचा सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकोलॉजी पूर्ण केलेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांना एमएमसीमध्ये नोंदणीची परवानगी देण्यात आली. त्याला विरोध करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

येत्या शुक्रवारी दिनांक ११ रोजी सकाळी ८ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ८ अशी २४ तास वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याचे जाहीर करण्यात आले.जळगाव आयएमएतर्फे मंगळवारी जिल्हाधिकारी यांना निवेदन देत आंदोलनात्मक कृती योजना सांगितली. यात ११ जुलै रोजी एकदिवसीय आरोग्य सेवा बंद असणार आहे. राज्यभरातील सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा (जीवनरक्षक आपत्कालीन सेवा वगळून) पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. १९ जुलैला मुंबईत एक भव्य रॅली आयोजित करण्यात येणार आहे. याबाबत लवकरच स्थळ व वेळ निश्चित केली जाणार आहे.
आयएमए महाराष्ट्र राज्याने स्पष्ट केले आहे की आधुनिक वैद्यक आणि होमिओपॅथी या दोन स्वतंत्र वैद्यकीय प्रणाली आहेत. एक वर्षांच्या कोर्सद्वारे होणारे क्रॉस-नोंदणीकरण हे डॉक्टरांच्या प्रशिक्षणाचा अपमान असून, रुग्णांच्या आरोग्यासाठी धोका निर्माण करणारे आहे. महाराष्ट्र शासनाने सदर अधिसूचना तत्काळ रद्द करावी, अशी आयएमएची मागणी आहे. दरम्यान, संघटनेने प्रचंड आक्रमक पवित्रा घेतला आहे.









