महाराष्ट्रात पावसाने जोर पकडला ; जळगाव जिल्ह्यासाठी हवामान खात्यानं वर्तविला ‘हा’ अंदाज?

जुलै 7, 2025 10:20 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जुलै २०२५ । जुलैच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रात पावसाने जोर पकडला असून आजपासून पुढचे ५ दिवस राज्यासाठी महत्वाचे असणार आहेत. हवामान खात्याने आज कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

Rn7july

दरम्यान, जळगाव जिल्ह्यातही गेल्या दोन ते तीन दिवसांपासून आषाढ सरींनी दमदार हजेरी लावली आहे. या आठवड्यातही दमदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. आज जळगाव जिल्ह्यात पावसाचा ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील पेरणी ८५ टक्क्यांपर्यंत पूर्ण

जळगावात गेल्या महिन्यात पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतेत होते. यामुळे पेरण्याही खोळंबल्या होत्या. मात्र गेल्या काही दिवसापासून पावसाच्या सरी बरसत आहे. जुलैच्या सुरुवातीलाच जळगावात पावसाने चांगली हजेरी लावली. जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे खरीप हंगामातील पेरण्यांना वेग आला आहे. जिल्ह्यातील पेरणी ८५ टक्क्यांपर्यंत पूर्ण झाली असून, येत्या १५ जुलैपर्यंत ९५ टक्क्यांपर्यंत पेरणी पूर्ण होईल, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

जळगाव जिल्ह्यात आठवडाभर दमदार पावसाचा अंदाज

दरम्यान हवामान विभागाने जळगाव जिल्ह्यात आगामी आठवडाभर दमदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच, आजपासून पुढील दोन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. जुलै महिन्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जुलै महिन्यात १८९ मिमी पाऊस होत असतो, त्यापैकी ६ जुलैपर्यंत जिल्ह्यात २५.२ मिमी पाऊस झाला आहे. तर जून ते सप्टेंबर या चार महिन्यातील एकूण सरासरीचा विचार केला तर जिल्ह्यात आतापर्यंत २३.७टक्के पाऊस झाला आहे.

राज्यातील या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट?

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज रायगड, रत्नागिरी, पुणे घाटमाथा, सातारा तर विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

या जिल्ह्यांना येलो अलर्ट?

आज मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, नंदूरबार, धुळे, नाशिक घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला आणि यवतमाळ या जिल्ह्यांना देखील मुसळधार पाऊस झोडपून काढण्याची शक्यता आहे. तर राज्यातील उर्वरीत भागात म्हणजे जळगाव आणि छत्रपती संभाजीनगरमधील तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यात आहे. या जिल्ह्यांना देखील येलो अलर्ट देण्यात आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now