जळगाव लाईव्ह न्यूज । २ जून २०२५ । भुसावळ रेल्वे विभागातील विविध रेल्वे स्थानकांवर कुली बांधवांच्या हमालीचे सुधारित दर लागू केले आहेत. हे नवीन दर १ जूनपासून लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार ४० किलो वजनाच्या प्रत्येक फेरीसाठी १०० रूपये आणि प्रतीक्षा शुल्कही निश्चित केले आहे.

नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, अकोला, खंडवा, बडनेरा, मूर्तिजापूर, पाचोरा, नांदुरा, निफाड, नवी अमरावती आदी स्थानकांवर हमाल सेवेचा दर प्रती फेरी १०० रुपये असेल. म्हणजेच या स्थानकांवर हमालांकडून एका फेरीसाठी ४० किलो वजनापर्यंत १०० रूपये इतके शुल्क आकारले जाईल. तसेच पहिल्या ३० मिनिटांनंतर प्रतीक्षा शुल्क लागू होईल. प्रत्येक अर्ध्या तासासाठी किंवा त्याच्या अंशासाठी अतिरिक्त १०० आकारले जातील. इतर लहान स्थानकांवर ८० रुपये दर असेल.

दिव्यांगांसाठी विशेष दर
दिव्यांग, आजारी प्रवाशांना स्ट्रेचर किंवा चाकांच्या खुर्चीद्वारे नेण्यासाठी दोन हमालांमार्फत सेवा घेतल्यास १५० आणि ४ हमालांद्वारे सेवा घेतल्यास २०० शुल्क आकारले जाईल.







