अभाविपचे तीन दिवसीय ‘अनुभूती’ उन्हाळी शिबिर उत्साहात

मे 26, 2025 5:29 PM

शंभरहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग; ग्रामीण जीवनाचे मिळाले प्रत्यक्ष अनुभव

shibir

जळगाव लाईव्ह न्यूज । विकासार्थ विद्यार्थी व अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जळगाव विभागाच्या वतीने आयोजित ‘अनुभूती’ या तीन दिवसीय उन्हाळी शिबिराचा उत्साही वातावरणात समारोप झाला. शहरी भागातील विद्यार्थ्यांना ग्रामीण संस्कृतीचा अनुभव यावा, सामाजिक जाणिवा वाढाव्यात व नेतृत्वगुण विकसित व्हावेत या हेतूने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरात जळगाव शहर व परिसरातील शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. उद्घाटन प्रसंगी श्री. नंदनलाल गादिया, देवगिरी प्रदेश सहमंत्री वरुणराज नन्नवरे, विभाग संयोजक भाविन पाटील व शिबिरप्रमुख चेतन राजपूत उपस्थित होते.

शिबिरात उद्योजकता विकासावर सत्र घेण्यात आले. श्रमसंस्कार करीत विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहीम राबवली.तसेच शेततळ्याचे निर्माण केले. सामाजिक विषयांवर प्रबोधनासाठी पथनाट्य सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये समुपदेशन, नेतृत्व, आणि सहकार्याचे महत्त्व रुजवणारे विविध खेळ तसेच ट्रेजर हंट आणि वादविवाद स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.

sbr 2

विद्यार्थ्यांनी गीत गायन, अनुभव कथनाच्या माध्यमातून आपली कला व भावना सादर केल्या. शिबिराच्या समारोप सत्रात विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शिबिरातील आनंददायी अनुभव आणि सामाजिक कार्याची प्रेरणा व्यक्त केली.

समारोप प्रसंगी विभाग संघटन मंत्री धनंजय शेरकर, भुसावळ जिल्हा संयोजक मोहित देसाई, जळगाव जिल्हा संयोजक तेजस पाटील उपस्थित होते. जळगाव जिल्हा प्रमुखांनी शिबिराला भेट दिली तर नगर विद्यार्थी विस्तारक वैष्णवी शितोळे शिबिरात पूर्ण वेळ सहभागी होत्या. अभाविपच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना केवळ नवा अनुभवच नाही तर सामाजिक भान आणि नेतृत्वकौशल्यही लाभले, असा सूर सर्वत्र उमटत होता.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment