जळगाव जिल्ह्यात आदर्श विवाह! दिराने केलं विधवा वाहिनीशी लग्न

मे 24, 2025 12:49 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मे २०२५ । जळगाव तालुक्यातील वावडदा येथे एका आदर्श विवाहामुळे दुर्दैवाने उद्ध्वस्त झालेल्या विधवेच्या आयुष्यात पुन्हा आशेचा किरण आला आहे. पतीच्या अकाली निधनानंतर दीपाली आणि सहा महिन्यांची मुलगी सेजलच्या जीवनात अंधार पसरला होता. मात्र दिराने पुढाकार घेत विधवा वहिनीशी विवाहगाठ बांधून तिला पुढील आयुष्यासाठी आधार देत समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. हा विवाह दोन दिवसांपूर्वी वावडदा येथे झाला.

vavda

वावडदा येथील रघुनाथ चिंतामण पाटील यांचा मोठा मुलगा विशाल याचा विवाह चंद्रपूर जिल्ह्यातील दीपालीशी झाला होता. शेती आणि दुग्धव्यवसाय सांभाळत विशाल आपले कुटुंब आनंदाने चालवत होता. त्यांच्या संसारवेलीवर सेजलच्या रूपाने कन्यारत्न फूलले. मात्र सेजल अवधी सहा महिन्यांची असताना विशालचे अचानक निधन झाले, आणि दीपाली व सेजलच्या जीवनात मोठा धक्का बसला. विशालच्या निधनानंतर प्रत्येक क्षण दीपालीसाठी असह्य झाला होता. तिच्या कुटुंबालाही हे दुःख पाहवत नव्हते.

अन् आदर्श विवाह पार पडला
दीपाली आणि सेजल यांना आधार मिळणार असल्याने दोन्ही कुटुंबांनी या विवाहास सहमती दर्शवली. वावडदा येथील भवानी मातेच्या मंदिरात मोजक्या नातेवाइकांच्या उपस्थितीत हा आदर्श विवाह झाला. दीपालीच्या उद्ध्वस्त झालेल्या आयुष्यात अजयच्या रूपाने पुन्हा एकदा आशेचा किरण आला आहे, आणि सेजललाही आता वडिलांचा आधार मिळाला आहे.

या कठीण काळात, विशालचे काका, माजी उपसरपंच रवींद्र चिंतामण पाटील, आणि बिलखेड्याचे पोलिस पाटील मुकुंदा पाटील यांच्याशी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख रखी कापडणे यांनी संपर्क साधला. विशालचा लहान भाऊ आणि दीपालीचा दीर, अजय, याच्यासाठी मुलगी शोधण्याऐवजी दीपालीशीच त्याचा विवाह करण्याचा विचार त्यांनी पुढे आणला. यावर विशालचे वडील रघुनाथ पाटील, दीपालीचे माहेरचे लोक आणि अजय यांच्याशी चर्चा करून सर्वानी सहमती दर्शवली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment