जळगाव लाईव्ह न्यूज । १० मे २०२५ । नगरपालिका व नगर परिषदेतील कर्मचारी तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांचे मागील दोन महिन्यांचे पगार थकलेले असून, त्यामुळे भारतीय कर्मचारी संघाचे सरचिटणीस ॲड. हरिहर पाटील यांनी मंगळवारपासून (दि.13) काळ्या फिती लावून काम करण्याचा इशारा दिला आहे. परिस्थिती निवळली नाही, तर पुढे युद्धजन्य स्थिती निर्माण करून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

मार्च व एप्रिल २०२५ या महिन्यांचे वेतन अद्याप न मिळाल्याने कर्मचाऱ्यांवर आर्थिक अडचणींचे संकट ओढावले आहे. मार्च महिना हा आयकर विभागाच्या दृष्टीने महत्त्वाचा असून, बँकेचे हप्ते, आरोग्य विमा हप्ते तसेच कुटुंबातील आजारपणामुळे कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

ॲड. पाटील यांनी स्पष्ट केले की, नगरपालिका व नगरपरिषदांनी सहअनुग्रह अनुदानाची वाट न पाहता नफा फंडातून कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते तत्काळ द्यावेत. मात्र, प्रशासन हे केवळ अनुदानाची वाट पाहत असल्याने कर्मचारी वेठीस धरले जात आहेत. जर वेतन वितरण तातडीने झाले नाही, तर मंगळवारपासून (दि.13) सर्व कर्मचारी काळ्या फिती लावून काम करतील. त्यानंतरही मागण्या मान्य न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा भारतीय कर्मचारी संघाचे सरचिटणीस ॲड. हरिहर पाटील यांनी दिला आहे.







