जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जून २०२१ । केरळमध्ये दोन दिवस उशिराने तीन जून रोजी दाखल झालेल्या मान्सूनने नंतर मात्र जोरदार मुसंडी मारली. त्यानंतर पाच जून रोजी मान्सून तळकोकणात दाखल झाला होता. दरम्यान, गुरुवारी (दि. १० जून) मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे.
पुढचे 3 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या तीन दिवसात कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टी होऊ शकते, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर मुंबई, ठाण्यासह कोकणात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्याशिवाय नाशिक, धुळे, नंदुरबारमध्ये यलो अलर्ट घोषित केला आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
दरम्यान, गेल्या दोन दिवसापासून मुंबईला मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पहिल्या पावसाने मुंबईची दाणादाण उडाली आहे.