⁠ 
शुक्रवार, मे 10, 2024

अंतुर्ली फाटा येथील पोलीस चौकी अखेर मध्यप्रदेश हद्दीत

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जून २०२१ । कोरोना बंदोबस्तामुळे मध्यप्रदेश शासनाने लावलेल्या पोलीस नाक्यावर मुक्ताईनगर येथील रुग्णालयातून घरी जात असतांना अंतुर्ली येथील ६ दिवसाच्या नवजात बाळ व सिझर शस्त्रक्रिया झालेल्या महिलेला दवाखान्याची कागदपत्र दाखवल्यावर सुद्धा मध्यप्रदेश पोलिसांनी थांबवून गाडीच्या खाली उतरवून त्रास दिला. मुक्ताईनगर येथून अंतुर्ली परिसरात जाण्यासाठी ईच्छापूर मार्गे राष्ट्रीय महामार्ग हा मुख्य रस्ता असून मध्यप्रदेश पोलिसांनी लावलेल्या नाक्यामुळे परिसरातील नागरिकांना व शेतकऱ्यांना मोठा त्रास होत आहे. 

यावेळी खासदार रक्षाताई खडसे ह्या अंतुर्ली येथे द्वारदर्शनासाठी जात असतांना त्यांना हा प्रकार लक्षात आला असता त्यांनी तत्काळ जिल्हाधिकारी बुऱ्हानपूर श्री. प्रविण सिंग यांना दूरध्वनी वरून संपर्क साधत सदर गोष्ट लक्षात आणून दिली तसेच नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल माहिती देऊन तत्काळ सदर पोलीस चौकी मध्यप्रदेश हद्दीत हलविण्याचा आदेश दिला असता सदर चौकी हलविण्यात आली.

मागील वर्षी सुद्धा सदर पोलीस चौकीमुळे अंतुर्ली येथील नागरिकास जीव गमवावा लागला होता तेव्हा संतप्त नागरिक आंदोलन करून तत्काळ सदर पोलीस बंदोबस्त नाका हटविण्यासाठी आंदोलन केले असता. खासदार रक्षाताई खडसेंनी प्रत्यक्ष आंदोलना ठिकाणी जाऊन जिल्हाधिकारी बऱ्हाणपूर (मध्यप्रदेश) यांच्याशी संवाद साधून सदर महाराष्ट्र राज्य सिमेत असलेला नाका शाहपूर रस्त्यावरील शिरसोदा फाट्यावर हलविण्यात आला होता.

परंतु आता पुन्हा सदर तपासणी नाक्यामुळे परिसरातील ये-जा करणाऱ्या समस्त नागरिक, शेतकरी व वाहन धारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे खासदार रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नाने सदर नाका मध्यप्रदेश हद्दीत हलविण्यात आला असून त्यामुळे सदर परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.