जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मार्च २०२५ । एसटी ही ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असून दररोज लाखो लोक एसटीने प्रवास करतात. परंतु आपली बस कुठे आहे?, कधी येणार हे समजत नाही. त्यामुळे तासांनतास एसटीची वाट पाहत बसावे लागत होते. पण आता तसे होणार नाही. कारण महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे तुम्हाला घरबसल्या तुमची एसटी बस कुठपर्यंत पोहोचली ते कळेल.

एसटी महामंडळाने ‘व्हीएलटी’डिव्हाइस तयार केले आहे. याच्या मदतीने प्रवाशाना एसटीचे लाइव्ह लोकेशन कळणार आहे. बसचे थांबे आणि स्थानकामध्ये बसचा येण्याचा अपेक्षित वेळ आधीच समजणार आहे.
राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक अॅप विकसित केलंय. या अॅपच्या मदतीने प्रवाशांना त्यांच्या तिकिटावरून लालपरीचं लाइव्ह लोकेशन समजणार आहे. प्रवाशांना बस कधी बस स्टॅण्डवर येणार कधी, सुटणार? याची अचूक माहिती मिळणार आहे. एसटीच्या ताफ्यातील सर्वच बसगाड्यांना व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम (व्हीएलटी) बसविल्यानंतर या अॅपवरून बसची सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यावर ही सुविधा सुरू होण्याची शक्यता आहे.
अॅपमधील ‘ट्रॅक बस’ या सुविधेत तिकिटावरील ट्रिप कोड टाकल्यावर बसचं लाइव्ह लोकेशन समजणार आहे. त्यातून इतर मार्गावरील गाड्यांचे थांबे देखील समजणार आहे. एसटीच्या मुंबई सेंट्रल मध्यवर्ती कार्यालयात अद्ययावत नियंत्रण कक्षाची स्थापना केलीय. त्याद्वारे राज्यभरातील एसटीवर नियंत्रण करण्यात येतील. एसटी बिघडली किंवा अपघात झाल्यास या अॅपमधून यंत्रणांना फोन करण्याची सुविधादेखील असणार आहे.