⁠ 
शुक्रवार, ऑक्टोबर 25, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | जिल्ह्यात मे महिन्यात बाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 4734 ने अधिक

जिल्ह्यात मे महिन्यात बाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 4734 ने अधिक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ०३ जून २०२१ । कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या विविध उपाययोजनांमुळे जिल्ह्यात मे महिन्यात आढळून आलेल्या 17 हजार 981 कोरोना बाधित रुग्णांपेक्षा 4 हजार 734 अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. या महिन्यात जिल्ह्यात एकूण 22 हजार 715 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब आहे.

जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत माहे फेब्रुवारीपासून बाधित रुग्णांची संख्या दिवसेदिवस वाढण्यास सुरुवात झाली होती. मात्र राज्य शासन व जिल्हा प्रशासनाने लावलेले कडक निर्बध, जिल्हा प्रशासनाने केलेल्या विविध उपाययोजना, माझे कुटूंब, माझी जबाबदारी अभियान, संशयित रुग्ण शोध माहिमेसह पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे मार्गदर्शन, जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व सामाजिक संस्थांचे सहकार्य यामुळे जिल्ह्यात कोरोनाची लाट थोपविण्यात प्रशासनाला यश आले आहे.

जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत फेब्रुवारी 2021 मध्ये 3 हजार 844 बाधित रुग्ण आढळून आले तर 1 हजार 650 रुग्ण बरे होऊन घरी गेले. मार्च महिन्यात जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने 28 हजार 140 बाधित रुग्ण आढळले तर 18 हजार 602 रुग्णांनी कोरोनावर मात केली. एप्रिल 2021 मध्ये जिल्ह्यात बाधित रुग्णांची संख्या उच्चांकी पातळीवर गेली असली तरी आरोग्याच्या वाढत्या सुविधांबरोबरच आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळे व जिल्हा प्रशासनाच्या उपाययोजनांमुळे बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली होती. या महिन्यात जिल्ह्यात सर्वाधिक 32 हजार 986 बाधित रुग्ण आढळले तर 33 हजार 569 रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर मे महिन्यात जिल्ह्यात 17 हजार 981 बाधित रुग्ण आढळले तर 22 हजार 715 रुग्णांनी कोरोनावर मात केली होती. मे महिन्यात बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या तब्बल 4 हजार 734 ने अधिक आहे. अशी माहिती कोविड-19 चे नोडल अधिकारी तथा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.