जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसानंतर आता हवामान कसे राहील? जाणून घ्या..
जळगाव लाईव्ह न्यूज । २९ डिसेंबर २०२४ । हवामान खात्याने जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार जिल्ह्यात 27 आणि 28 डिसेंबर रोजी अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पिकांची नासधूस झाली आहे, विशेषत: रावेर व यावल तालुक्यात ही परिस्थिती अधिक गंभीर आहे. दरम्यान अवकाळी पावसाच्या हजेरी नंतर आता जिल्ह्यातील तापमान कसं राहणार असा प्रश्न जळगावकरांच्या मनात आहे. दरम्यान आज जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज नाहीय.
हवामान विभागाने जळगाव जिल्ह्यात शुक्रवारी व शनिवारी अवकाळी पावसासह गारपीट होण्याचा अंदाज वर्तविला होता, ज्यानुसार जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यांसह अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या केळीच्या बागा, अन्य पिके जमीनदोस्त झाली आहेत. रावेर व यावल तालुक्यातील काही भागात गारपिटीसह पाऊस झाला आहे, ज्यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला.
दरम्यान या पावसानंतर आता जिल्ह्यात थंडीचा कडाका कधी परतणार असा प्रश्न पडला आहे. एकीकडे गेल्या आठवड्यात उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे जळगाव गारठले होते. जळगावमधील किमान तापमान ७ अंशापर्यंत घसरले होते. मात्र यातच अवकाळी पावसाच्या सावटामुळे किमान तापमानात वाढ होऊन थंडीचा कडाका कमी झाला.
शनिवारी (२८ डिसेंबर) जळगावातील किमान तापमान १९. ८ पर्यंत तर कमाल तापमान २७ अंश नोंदविले. दरम्यान हवामान खात्याने येत्या काही दिवसांत उत्तर भारतातील काही राज्यात थंड लाटेचा इशारा जारी केला आहे. यामुळे महाराष्ट्रातही थंडी लाट पुन्हा परतण्याची शक्यता आहे. यामुळे जळगावातही पुढील काही दिवसांत थंडी वाढणार असल्याची शक्यता आहे.