जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळ शहरातील नारायण कॉम्प्लेक्सजवळ ५५ वर्षीय प्रौढास तिघांनी चाकूचा धाक दाखवून लुटले. ही घटना नुकतीच घडली होती. याप्रकरणी शहर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तर एक संशयित फरार आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संशयित जय मनोज जाधव (२४), रवी देवसिंग कसोटे (२४) दोन्ही रा. वाल्मीक नगर, भुसावळ यांना शनिवारी अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केले असता १६ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. त्यांच्याकडून गुन्हा उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सुनील यशवंत पाटील (५५) रा. जुना सातारा मरीमाता मंदिरामागे राहतात. दोन डिसेंबरला १० वाजेच्या सुमारास नारायण नगर कॉम्प्लेक्स जवळून जात असताना तिघांनी त्यांना थांबविले. संशयित जय मनोज जाधव याने चाकू दाखविला तर रवी कसोटे याने हात धरले. तिसरा फरार संशयिताने त्यांच्या खिशातून ४५ हजार रोख व १७ हजार रुपये किमतीचा मोबाइल हिसकाविला होता. तपास पोलिस उपनिरीक्षक इकबाल इब्राहिम अली सय्यद करीत आहेत.