केळी पिकावरील रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषि विभागाच्या मार्गदर्शक सुचना

जून 2, 2021 3:18 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ०२ जून २०२१ । जळगाव जिल्ह्यातील केळी हे प्रमुख फळपिक असून सुमारे 45 हजार हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड केली जाते. कुकुंबर मोसॅक व्हायरस (सी.एम.व्ही) हा केळी पिकावरील प्रमुख विषाणुजन्य रोग आहे. दरवर्षी माहे जुलै ते सप्टेंबर दरम्यान सी.एम.व्ही रोगाचा मोठया प्रमाणावर प्रादुर्भाव आढळून येतो.

jalgaon banana

सततचे ढगाळ वातावरण, जून-जुलै महिन्यात वारंवार पडणारा अखंडित पाऊस, प्रकाशाची तीव्रता कमी असणे व किमान तापमान 24-25 अंश से. असणे. जास्त आर्द्र हवामान इत्यादी घटक सी.एम.व्ही. रोगास पोषक असतात. सुरवातीस कोवळया पानांवर हरितद्रव्य विरहित, पिवळसर पट्टे दिसणे, पानाचा पृष्ठभाग आकसला जाऊन व कडा वाकडया होऊन पानांचा आकार लहान होणे, पानांच्या शिरा ताठर होऊन संपूर्ण पान कडक होणे, पानांच्या शिरांमधील भाग काळपट पडून पाने फाटणे, पोंग्याजवळील पाने पिवळे पडून पोंगा सडणे, झाडांची वाढ खुंटणे इत्यादी लक्षणे सी.एम. व्ही. रोगात आढळतात.

सी.एम.व्ही विषाणूचा प्राथमिक प्रादुर्भाव रोगट कंदापासून होतो तसेच या रोगाचा दुय्यम प्रसार प्रामुख्याने मावा किडीच्या माध्यमातून होतो. सी.एम.व्ही. विषाणूची जवळजवळ 1 हजार यजमान पिके आहेत. सी.एम.व्ही, रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्याच्या नियंत्रणासाठी कोणतेही ठोस उपाय करता येत नसल्याने सी.एम.व्ही. रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढील उपाययोजना करणे आवश्यक आहे.

प्रादुर्भावग्रस्त झाडे मुळासकट उपटून दूर ठिकाणी जाळून किंवा गाडून टाकावी. बागेची 2-3 वेळा 4 ते 5 दिवसांनी नियमित निरिक्षण करुन रोगग्रस्त झाडे आढळल्यास त्यांचीही विल्हेवाट लावावी. बागेतील तसेच बांधावरील मोठा केणा, छोटा केणा, धोतरा, काहे रिंगणी चिलघोल, शेंदाड, गाजरे गवत इत्यादी प्रकारची तणे काढून बाग स्वच्छ ठेवावी, पिकांची फेरपालट करावी. केळीत काकडी, भोपळा, कारली, दुधीभोपळा, गिलके, चवळी, टोमॅटो, वांगे, मिरची, मका या पिकांची लागवड करु नये. तसेच केळी बागेभोवती रान कारली, शेंदळी, कटुर्ले, गुळवेल यासारख्या रानटी झाडांचे वेल नष्ट करावेत.

मावा या वाहक किडीच्या बंदोबस्तासाठी डायमेथोएट 30 ई.सी 20 मिली किंवा थायोमिथोक्झाम 25 डब्लु जी. 2 ग्रॅम किंवा इमिडाक्लोप्रीड 17.8 एस.एल 5 मिली या किटकनाशकांची 10 लीटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. असे संभाजी ठाकूर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now