जळगाव लाईव्ह न्यूज । १९ नोव्हेंबर २०२४ । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोफा थंडावल्यानंतर पुढील ४८ तास राजकीय पक्षांना बंदी असणार आहे. या कालावधीत नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर आयोगाकडून कारवाई केली जाणार आहे. तर या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पैशांचा पाऊस झाल्याचं दिसून आलं. या कालावधीत आयोगाच्या भरारी पथकाने कोट्यवधींची रोकड जप्त केली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर भरारी पथकाचं राज्यातील सर्वच घडामोडींवर चोख लक्ष होतं. या कालावधीत काही ठिकाणी नाकाबंदी देखील होत्या. राज्यातील विविध नाकाबंदीत कोट्यवधींची रोकड जप्त केली.
महाराष्ट्रात आतापर्यंत ६६० कोटी १८ लाखांची जप्त करण्यात आली आहे. यात १५३ कोटी ४८ लाख रोकड पथकाकडून जप्त करण्यात आले. तर ७१ कोटी १३ लाखांची दारु देखील जप्त करण्यात आली. ७२ कोटी १४ लाखांचे अंमली पदार्थ, २८२ कोटी ४९ लाखांचे सोने-चांदी दागिने, ८० कोटी ९४ लाखांच्या वस्तू जप्त करण्यात आल्या. या विषयीची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केली.
जळगाव जिल्ह्यातही कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त
दरम्यान जळगाव जिल्ह्यातही पोलीस आणि निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने मोठी कारवाई केली आहे. विधानसभेची आचारसंहिता लागू झाल्यापासून जिल्ह्यात आतापर्यंत रोख रक्कम, सोने, चांदी, शस्त्रे, दारु असा एकूण १७ कोटी ५३ लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली.