“व्हिजन महाराष्ट्र 2029” ; भाजपाच्या निवडणूक जाहीरनाम्यात आश्वासन
जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने आपला निवडणूक जाहीरनामा जाहीर केला आहे. गरिबांसह मध्यमवर्गीयांचे सर्व स्वप्न पूर्ण होतील अशी आश्वासने या जाहीरनाम्यात देण्यात आली आहे. युवक, महिला, वृद्ध अशा सर्वच घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न या जाहीरनाम्यात करत, विधानसभा निवडणुका संपल्यानंतर शंभर दिवसात व्हिजन महाराष्ट्र 2029 सादर करण्याचे आश्वासन देत महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करण्याचे आश्वासन देखील यात देण्यात आले आहे.
जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवण्याचा वादा
वाढत्या महागाईचे पार्श्वभूमीवर येणाऱ्या काळात महाराष्ट्रात जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवण्याचा वादा भाजपाने केला आहे. लडकी बहीण योजनेची रक्कम 1500 रुपयांवरून 2100 रुपये दरमहा करणे, किसान सन्मान योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला प्रतिवर्ष 12000 हजार रुपयां ऐवजी 15 हजार रुपये देणे, वृद्ध पेन्शन धारकांना दरमहा 2100 रुपये देण्याचे आश्वासन देखील या जाहीरनामात देण्यात आले आहे. अक्षय अन्न योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबांना मोफत अन्नधान्य देण्याचे आश्वासन देखील जाहीरनामा देण्यात आले आहे.
शेतकऱ्यांसाठी घोषणा
शेतकऱ्यांच्या कृषी वीज पंपाचे बिल शून्य रुपये महायुतीने आधीच केले आहे. भविष्यात वीज बिलात 30 टक्के कपात होणार असून सौर उर्जेवर जास्तीत जास्त भर देण्याचा भाजपाचा मानस आहे. शेतीसाठी आवश्यक खतांवरील राज्य आणि वस्तू सेवा कर सवलत देण्याचे आणि सोयाबीनला प्रतिक्विंटल सहा हजार रुपये हमीभाव देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
महिलांसाठी योजना
ग्रामीण भागात तळागाळात काम करणाऱ्या अंगणवाडी व आशा सेविकांना दरमहा पंधरा हजार रुपये देण्यात येतील. पुढील तीन वर्षात 50 लाख महिलांना लखपती दीदी बनविण्यासाठी 500 बचत गटांकरिता 1000 कोटींचा फिरता निधी उपलब्ध करून देण्यात येईल. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात ही रक्कम वाढवून 2100 रुपये करण्यात येईल. म्हणजे वर्षाला जवळपास 25 हजार रुपये प्रत्येक महिन्याच्या खात्यात जमा होतील.
ग्रामीण भागासह शहरी विकासाला चालना
ग्रामीण भागातील विकासाला चालना देण्यासाठी 45 हजार गावांमध्ये पाणंद रस्ते बांधण्याचे आश्वासन भाजपाने जाहीरनाम्यात दिले आहे. शहरी विकासाला चालना देण्यासाठी मेक इन महाराष्ट्र अंतर्गत आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वापर करून नागपूर पुणे नाशिक ही शहरे एका धाग्यात बांधण्यात येतील आणि या शहरांमध्ये एरोस्पेस हब बनवण्याचा देखील मानस असल्याचे जाहीरनाम्यात म्हटले आहे.
विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा
महारथी आणि अटल टिंकरिग लॅब योजनेच्या माध्यमातून सर्व शासकीय शाळांमध्ये रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रशिक्षण राबविण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्रातील तब्बल दहा लाख विद्यार्थ्यांना दरमहा दहा हजार रुपये देण्याचे आश्वासन देखील देण्यात आले आहे. ओबीसी एस इ बी सी इ तसेच आणि व्ही जे एन टी विद्यार्थ्यांना शिक्षण आणि परीक्षा शुल्कातून संपूर्णपणे प्रतिवृती सवलत देण्याचे आश्वासन भाजपाने दिली आहे. महाराष्ट्रात कौशल्य जनगणना आणि उद्योगांच्या गरजेनुसार कुशल मनुष्यबळ निर्मिती करणे प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज आकांक्षा केंद्र स्थापन करून दहा लाख उद्योजक घडविण्याचे आश्वासन देखील भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात दिले आहे.