जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ऑक्टोबर २०२४ । महाराष्ट्रात होऊ घातलेली विधानसभा निवडणुकीच्या तारखासंदर्भात मोठी बातमी समोर आलीय. ती म्हणजे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची आज घोषणा होणार असून याच पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दुपारी साडेतीन वाजेल पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्रसह झारखंड विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल, अशी माहिती समोर आली आहे.
२८ नोव्हेंबर रोजी विधेनसभेचा कार्यकाळ संपणार आहे, त्याआधी राज्यातील विधानसभा होतील, असे निवडणूक आयोगाने जाहीर केले होते. आज निवडणुकीची घोषणा जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू होणार आहे. महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर रोजी संपणार आहे. यंदा दिवाळी २९ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत आहे. सणासुदीच्या काळात निवडणुका घेतल्या जात नाहीत. त्यामुळे दिवाळीच्या आधी किंवा दिवाळीच्या नंतर नोव्हेंबर महिन्यात निवडणुका होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या महितीनुसार, १० नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर यादरम्यान राज्यात मतदान होईल. २० ते २५ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल. २०१९ मध्ये २१ ऑक्टोबर रोजी २८८ जागांसाठी राज्यात एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या होत्या.
युती-आघाडी अॅक्शनमोडमध्ये
दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि मविआकडून जोरदार हालचाली सुरू आहेत. आज महायुतीची संयुक्त पत्रकार परिषध होणार आहे. त्याशिवाय निवडणुकीच्या तयारीसंदर्भात काँग्रेसची महत्त्वाची बैठकही होणार आहे. निवडणुकीच्या तयारीसाठी नेमलेल्या निरीक्षकांसोबत ही बैठक होणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यांची तयारीही पूर्ण झाली आहे.