जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑक्टोबर २०२४ । महाराष्ट्र्रात विधानसभा निवडणुका कधी जाहीर होणार आणि आचारसंहिता कधीपासून लागेल याबाबत सध्या चर्चा सुरु आहेत. कारण आधीच लांबलेली विधानसभा निवडणूक कधी लागतेय याकडं सर्वाच्या नजरा लागून राहिल्या आहेत. आता अशातच महाराष्ट्र्रात पुढील २४ तासात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे.
कारण केंद्रीय निवडणूक आयोगाकडून उद्या पत्रकारपरिषद घेण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये झारखंड आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे याच पार्श्वभूमीवर सध्या सत्तेत असलेल्या महायुती सरकारने मंत्रिमंडळाची बैठक बोलवली आहे. महायुती सरकारची ही शेवटची मंत्रिमंडळाची बैठक ठरण्याची शक्यता आहे. त्यासाठी आज मोठ्या प्रमाणावर निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले जाणार आहे.
महाराष्ट्रातील विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबर रोजी संपत आहे. त्याआधी २८८ मतदारसंघात निवडणुका होतील, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केले होते. महाराष्ट्र झारखंडमधील विधानसभा निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मंगळवारी केली जाऊ शकते. त्यामुळे २४ तासांनंतर राज्यात आदर्श आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात २८८ जागांवर तर झारखंडमध्ये ८१ जागांवर दोन टप्प्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. १५ नोव्हेंबर रोजी मतदान होण्याची शक्यता आहे.