केतकीताई पाटील यांच्याकडून सर्व समाज समावेशक कुमारी सन्मान व पूजन
जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑक्टोबर २०२४ । भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. केतकीताई पाटील यांनी या नवरात्रीमध्ये सर्व समाज समावेशक कुमारीका सन्मान व पूजनाचे आयोजन करून चांगला पायंडा घालून देण्याचा प्रयत्न केला आहे.
नवरात्र उत्सवामध्ये बालिका पूजनाला फार महत्त्व आहे. हाच धागा धरून डॉ. केतकिताई पाटील यांनी सर्व समाजातील कुमारीकांना सन्मान देणे, मिष्टान्न भोजन, शालेय उपयोगी साहित्य आणि शृंगार साहित्य उपहार म्हणून देण्याचा उपक्रम राबवला. मुलींमध्ये शिक्षणाची ओढ निर्माण व्हावी, समाज बांधवांचे सामाजिक वीण अधिक घट्ट व्हावी यासाठी हा प्रयत्न केला गेला.
हा उपक्रम राबवताना जुने जळगाव मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरातील बाल भीम व्यायाम शाळा मित्र मंडळाच्या सहकार्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर येथे, शेंदुर्णी येथे आई रेणुकाई मित्र मंडळ, वनदेव दत्त मंदिर वाडी दरवाजा, चोपडा येथे श्याम भाऊ गुजराती यांच्या सहकार्याने, पूनखेडा तालुका रावेर येथे तेथील सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडळाच्या सहकार्याने दुर्गादेवीच्या मंदिरात, भुसावळ येथे प्रतीक्षा महिला मंडळाच्या सहकार्याने संतोषी माता बहुउद्देशीय सभागृहात, यावल तालुक्यातील आसराबारी व वड्री धरण येथील आदिवासी पाडे येथे सरपंच अजय भालेराव यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात आला.
या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक झाले असून सुदृढ आणि निकोप समाज निर्मितीसाठी असे उपक्रम राबवले जाणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन अनेक मान्यवरांनी केले आहेत. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी भाजपाचे पदाधिकारी, समाजसेवक, माजी नगरसेवक, दुर्गा उत्सव मंडळे, ग्रामस्थ आणि त्या त्या ठिकाणी च्या स्थानिकांचे सहकार्य लाभले.
एखाद्या राजकीय पक्षाच्या महिला मोर्चां च्या पदाधिकाऱ्याकडून राज्यातील पहिलाच असा उपक्रम राबविला गेला असावा. या उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिकता जोपासण्याचा प्रयत्न झाला. त्यास सकारात्मक प्रतिसाद लाभला आहे. 500 पेक्षा अधिक कुमारिकांना दिला उपहार.