जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑक्टोबर २०२४ । महायुतीचे सरकार जनतेसाठी काहीच करत नसल्याचा आरोप उबाठा गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यातून केला. यावरून शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार प्रत्त्युत्तर दिल आहे. ‘हम तो डुबेंगे सनम, तुझको भी ले डुबेंगे’ अशी राऊत यांची अवस्था आहे.
“या राज्यात 20 वर्षांपासून मी आमदार आहे. मी सुद्धा बरेच मुख्यमंत्री पाहिले. एक वर्षात 14 वेळेस मुख्यमंत्री कोणी जिल्ह्यात आणायचं काम केलं असेल तर ते एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. कावळा कितीही उचीवर गेला तरी तो कबूतर बनत नाही, हे मी संजय राऊतला सांगतोय. कोण जिंकणार आणि कोण हारणार हे तर वेळ सांगेन”, असे मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले. ते शिवसेनेच्या मुंबईतील दसरा मेळाव्यात बोलत होते.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पिक विमा योजना आणली. गोरगरिबांना सणासुदीच्या दिवसात आनंदाचा शिधा, ग्रामीण भागात आपला दवाखाना सुरू केला. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री आरोग्य सहायता निधीतून केवळ अडीच कोटी रुपये दिले तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुमारे सव्वाशे कोटी रुपये वाटप केले. तरीही या सरकारने काय केले असा प्रश्न राऊत विचारत आहेत, अशा शब्दात गुलाबरावांनी राऊत यांच्यावर निशाणा साधला.
पुढे बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, लाडके मुख्यमंत्री आणि लाडक्या बहिणीचे भाऊ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. राज्यातील ५० टक्के लोकसंख्या असलेल्या महिला आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा ‘कार्यक्रम’ करणार आहे. आतापर्यंत बाई माणसाकडे पैसे मागायची, आता माणूस बाईकडे पैसे मागु लागला आहे. मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणीचे हात सक्षम केल्यामुळे हा चमत्कार झाला आहे, असं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं.