⁠ 
रविवार, डिसेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | दिव्यांग बालकांच्या चेहऱ्यावर हसू फुलविणारा कलामहोत्सव

दिव्यांग बालकांच्या चेहऱ्यावर हसू फुलविणारा कलामहोत्सव

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखेचा उपक्रम ‘यहाँ के हम सिकंदर’

जळगाव लाईव्ह न्यूज । दिव्यांग बालकांमधील सुप्त कलागुणांना प्रोत्साहन देवून त्यांना सक्षम प्रवाहात आणण्यासाठी बालरंगभूमी परिषदेतर्फे ‘यहाँ के हम सिकंदर’ या विशेष मुलांच्या कलामहोत्सवाचे जळगावात आयोजन करण्यात आले होते. शहरातील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात रंगलेल्या या कलामहोत्सवाने ६०० दिव्यांग बालकांच्या व त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावर हसू फुलविले.

दिव्यांग बालकांसाठी गेल्या २२ वर्षांपासून काम करत असणाऱ्या बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्ष ॲड.निलम शिर्के सामंत यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या विशेष मुलांच्या कलामहोत्सवाच्या उद्‌घाटन प्रसंगी रंगमंचावर बँक ऑफ महाराष्ट्रचे झोनल मॅनेजर प्रविण सिंग, नवजीवन प्लस सुपरशॉपचे संचालक अनिलभाई कांकरिया, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील, जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी विजय रायसिंग, विशेष दिव्यांग विभागाच्या वैद्यकिय सामाजिक कार्यकर्त्या माधुरी भागवत, बालरंगभूमी परिषदेच्या मध्यवर्तीकडून आलेले निरीक्षक नागसेन पेंढारकर, बालरंगभूमी परिषद जळगावचे अध्यक्ष योगेश शुक्ल, प्रमुख कार्यवाह विनोद ढगे, कार्याध्यक्ष संदीप घोरपडे आदी उपस्थित होते.

सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजन व दीपप्रज्वलन झाल्यानंतर उत्कर्ष मतिमंद विद्यालयाचा विद्यार्थी सागर गायकवाड याने स्वागतगीत सादर केले. प्रास्ताविक करतांना विनोद ढगे यांनी या कलामहोत्सव आयोजनामागची भूमिका व महत्व विषद केले. त्यानंतर मान्यवरांपैकी अनिलभाई कांकरिया, प्रविण सिंग, विजय रायसिंग, योगेश पाटील आदींनी मनोगत व्यक्त करत या महोत्सवाला शुभेच्छा दिल्यात. तसेच कलामहोत्सवाच्या समारोप प्रसंगी डॉ.इंद्राणी मिश्रा व हेमाताई अमळकर यांची विशेष उपस्थिती होती. त्यांनी दिव्यांग बालकांचे कौतुक करण्यासोबतच सर्व सहभागी दिव्यांग बालकलावंतांना व दिव्यांग विद्यालयांना प्रमाणपत्र, सन्माचिन्ह व प्रत्येक विद्यालयातील पाच शिक्षकांचा मानचिन्ह देवून गौरव केला.

या कलामहोत्सवात जिल्ह्यातील १९ शाळांनी सहभाग घेत आपले सादरीकरण केले. या सादरीकरणात २७४ दिव्यांग बालकलावंतांनी आपले वैविध्यपूर्ण सादरीकरण करत उपस्थित प्रेक्षकांचे डोळ्यांचे पारणे फेडले. या बालकलावंतांच्या सादरीकरणासाठी १३९ विशेष मुलांच्या शिक्षकांनी परिश्रम घेतलेत. या कलामहोत्सवाला २६६ दिव्यांग प्रेक्षकांनीही आपली उपस्थिती देत, सादरीकरण करणाऱ्या बालकलावंतांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
भंवरलाल ॲण्ड कांताबाई जैन मल्टीपर्पज फाऊंडेशनचे विशेष सहकार्य लाभले होते. कलामहोत्सवाच्या यशस्वीतेसाठी उत्कर्ष मतिमंद विद्यालयाचे विशेष शिक्षक राहुल पाटील, बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखेचे उपाध्यक्ष हनुमान सुरवसे, अमोल ठाकूर, कार्याध्यक्ष संदीप घोरपडे, कोषाध्यक्ष सचिन महाजन, प्रवक्ता हर्षल पवार, आकाश बाविस्कर, सोशल मिडीया समितीप्रमुख मोहित पाटील, कार्यकारिणी सदस्य नेहा पवार, सुदर्शन पाटील, ज्ञानेश्वर सोनवणे आदींनी परिश्रम घेतलेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.श्रध्दा पाटील यांनी तर कर्णबधीर विद्यार्थ्यांसाठी साइन लॅग्वेजमध्ये विशेष शिक्षक प्रताप इंगळे यांनी केले तर आभार योगेश शुक्ल यांनी मानले.

पालकांच्या चेहऱ्यावर हसू आणि आसू
दिव्यांग बालकांचे सादरीकरण सुरु असतांना, त्यांचे पालकही यावेळी प्रेक्षागृहात उपस्थित होते. आपले मुल रंगमंचावर सादरीकरण करत असतांना पालकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हसू तर कौतुकाचे व अनुभूतीचे आसूही होते. हा महोत्सव आयोजित केल्याबद्दल पालकांनी बालरंगभूमी परिषदेचे आभार मानले.

दिव्यांग बालकांनी बनविलेल्या वस्तू प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
या कलामहोत्सवाचे औचित्य साधत सहभागी झालेल्या मूकबधीर निवासी विद्यालय पिंपळगाव हरेश्वर, विवेकानंद प्रतिष्ठान जळगाव संचलित श्रवण विकास मंदिर कर्णबधीर विद्यालय, उत्कर्ष मतिमंद विद्यालय जळगाव, रुशील मल्टीपर्पज फाऊंडेशन संचालित उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्र या चार शाळांनी दिव्यांग बालकांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री स्टॉल लावले होते. कलामहोत्सवाला आलेल्या मान्यवरांसह प्रेक्षकांनी या स्टॉलला भेटी देत. दिव्यांग बालकांचे कौतुक करत, वस्तूंची उत्स्फूर्तपणे खरेदीही केली.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.