जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑक्टोबर २०२४ । ऑनलाईन फसवणुकीच्या घटना मोठ्या वाढल्या असून ऑनलाइन ट्रेडिंगच्या नावाखाली अनेकांना लाखोंचा चुना लावला जात असल्याचे प्रकार सातत्याने समोर येत आहे. आता असाच एक प्रकार जळगावमधून समोर आलाय. शेअर मार्केटमध्ये चांगल्या नफ्याचे आमिष दाखवून संजय राजाराम वसतकार (वय ४२, रा. एसएमआयटी कॉलेज) यांना ११ लाख ८२ हजार रुपयांचा गंडा घातला. या प्रकरणी वसतकार यांच्या तक्रारीनुसार सायबर पोलिसांत गुन्हा दाखल झाला.
एसएमआयटी कॉलेज परिसरातील संजय वसतकार हे ऑनलाइन ट्रेडिंग करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. जुलैत त्यांना एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड करण्यात आले होते. त्या ग्रुपमध्येअॅडमिन नारायण जिंदाल व चिन्मयी रेड्डी नामक व्यक्तींनी शेअर मार्केटमध्ये कोणते शेअर कधी खरेदी करावे, कोणत्या शेअरमध्ये पैसे गुंतवले तर अधिक फायदा होईल, याची माहिती शेअर केली होती.
सप्टेंबरच्या सुरुवातील चिन्मयीने वसतकार यांना शेअर मार्केटमध्ये नफा देणाऱ्या कंपन्या आहेत असे सांगून कोटक नावाचे अॅप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगितले. नंतर १० लाख रुपये गुंतवण्यास सांगितले. वसतकार यांनी रक्कम गुंतवल्यावर त्यांना २ लाख ८२ हजार रुपयांचा नफा दिसू लागला; परंतु नंतर आणखी एक शेअर घेण्यास त्यांना चिन्मयीने आठ लाख रुपयाचे कर्ज घेण्यास भाग पडले.
१४ सप्टेंबर रोजी वसतकार यांना चिन्मयीने मेसेज पाठवून कर्ज फेडा तरच तुम्हाल नफ्याची रक्कम मिळेल असे सांगितले. काही दिवसांनंतर गुंतवणुकीवर झालेल्या नफ्याची रक्कम काढता येत नसल्याचे संजय वसतकार यांच्या लक्षात आले. फसवणूक झाल्याचे कळताच तत्काळ त्यांनी सायबर पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून नारायण जिंदल व चिन्मई रेड्डी या दोघांविरुद्ध सायबर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक नीलेश गायकवाड तपास करीत आहेत.