⁠ 
मंगळवार, सप्टेंबर 24, 2024
Home | महाराष्ट्र | महाराष्ट्रातील ‘या’ शेतकऱ्यांना दिलासा; सरकारकडून २३७ कोटींच्या निधी वितरणास मंजूरी..

महाराष्ट्रातील ‘या’ शेतकऱ्यांना दिलासा; सरकारकडून २३७ कोटींच्या निधी वितरणास मंजूरी..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ सप्टेंबर २०२४ । राज्यात जून, २०२४ ते ऑगस्ट, २०२४ या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता २३७ कोटी ७ लाख १३ हजार इतका निधी वितरीत करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. या बाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आल्याने संबधित शेतकऱ्यांना याचा लाभ होईल, अशी माहिती, मदत, पूनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी दिली.

मंत्री पाटील यांनी सांगितले, अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते. तसेच, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते. केंद्र शासनाने विहित केलेल्या नैसर्गिक आपत्तींव्यतिरिक्त राज्य शासनाने अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्राचे उधाण व आकस्मिक आग या आपत्तींमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले असून सततचा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती घोषित केली आली आहे.

मंत्री पाटील यांनी सांगितले, जून ते ऑगस्ट, २०२४ या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानापोटी बाधितांना मदत देण्याबाबत संबधित विभागीय आयुक्त यांचेकडून निधी मागणीचे प्रस्ताव शासनास प्राप्त झाले होते त्यानुसार शेतीपिकांच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता २३७ कोटी ७ लाख १३ हजार इतका निधी वितरीत करण्यास मंजूरी देण्यात आली आहे.

या जिल्ह्यांना इतका निधी वितरीत होणार
यामध्ये गडचिरोली जिल्ह्यासाठी ५७७२.४२ लक्ष, वर्धा जिल्ह्यासाठी ३६९१.७६ लक्ष, चंद्रपूर जिल्ह्यासाठी ७४२९.२२ लक्ष, नागपूर जिल्ह्यासाठी १८३६.५६ लक्ष, पुणे जिल्ह्यासाठी ४५८.७१ लक्ष, सातारा जिल्ह्यासाठी ८४.८६ लक्ष, सांगली जिल्ह्यासाठी १११३.२५ लक्ष, अमरावती जिल्ह्यासाठी ५१.०१ लक्ष, अकोला जिल्ह्यासाठी १२९०.१७ लक्ष, यवतमाळ जिल्ह्यासाठी ५४७.९६ लक्ष, बुलढाणा जिल्ह्यासाठी १३५८.६६ लक्ष आणि वाशिम जिल्ह्यासाठी ७२.५५ लक्ष अशा २३७ कोटी ७ लाख १३ हजार इतका निधी वितरीत करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील देखील काही ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून पंचनामा करून मदतीची मागणी केली जात आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.